‘विदर्भ’वाद्यांना डीनने लावला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 12:11 AM2018-08-05T00:11:09+5:302018-08-05T00:12:28+5:30
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी दररोज विदर्भ एक्स्प्रेसने अपडाऊन करतात. परिणामी विदर्भ एक्स्प्रेस येईपर्यंत रुग्णांना उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागत होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी दररोज विदर्भ एक्स्प्रेसने अपडाऊन करतात. परिणामी विदर्भ एक्स्प्रेस येईपर्यंत रुग्णांना उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. यासर्व प्रकाराची तक्रार केल्यानंतर त्याची दखल वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व्ही.पी. रुखमोडे यांनी घेत १ आॅगस्टपासून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य केले आहे. परिणामी विदर्भ एक्स्प्रेसने अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अडचण झाली असून बुधवारपासून अपडाऊनला काही प्रमाणात ब्रेक लागल्याचे चित्र आहे.
गोंदिया येथील सर्व शासकीय कार्यालयांची वेळ विदर्भ एक्स्प्रेस ठरविते असे म्हटले जाते. यात वास्तविकता सुद्धा आहे. त्यामुळे बऱ्यांच शासकीय कार्यालयातील कामाकाज विदर्भ एक्स्प्रेस आल्याशिवाय सुरू होत नाही. त्याचा फटका जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना बसत होता. त्यामुळे प्रकाराबाबत रोष व्यक्त केला जात होता. मात्र महत्त्वपूर्ण सेवा समजली जाणाऱ्या आरोग्य विभागाचे डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचारी सुद्धा दररोज विदर्भ एक्स्प्रेसने अपडाऊन करतात. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व बीजीडब्ल्यू रुग्णालयात उपचारासाठी येणाºया रुग्णांना विदर्भ एक्स्प्रेस येईपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे बरेचदा रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या.
लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व्ही.पी.रुखमोडे यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना १ आॅगस्टपासून बायोेमेट्रिक हजेरी अनिवार्य केली.
यासाठी वर्ग १ चे ६८ आणि वर्ग २ च्या १३३ कर्मचाऱ्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. बायोमेट्रिक हजेरीचा अहवाल आरोग्य संचालकांकडे पाठविण्यात येणार आहे.
वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अपडाऊन करण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी १ आॅगस्टपासून बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे. लेटलतीफ कर्मचाऱ्यांचा अहवाल कारवाईसाठी आरोग्य संचालकांकडे पाठविण्यात येईल.
- व्ही.पी.रुखमोडे
अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया.