गोंदिया : अवघ्या जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या डेंग्यूने आता शहरात आपले पाय पसरण्यास सुरूवात केल्याचे दिसून येत आहे. यातही सिव्हील लाईंन परिसरात डेंग्यूचा जास्तच प्रकोप बघावयास मिळत आहे. जुन्या आरटीओ कार्यालय परिसरात मोठ्या संख्येत रूग्ण आढळले आहेत. तेथील अनेक घरातील रूग्णांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असून यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. शहरातील उच्चभू्र परिसर म्हणून सिव्हील लाईंन ओळखली जाते. गोंदियात मात्र तशी स्थिती दिसत नाही. आतापर्यंत या परिसरात चालायला धड रस्ते नाही. अस्वच्छता आणि कचऱ्याचे ढिगारे नित्याचीच बाब झाली आहे. नेमक्या या स्थितीमुळेच येथे डासांचा प्रकोप वाढला असून डेंग्यूची लागण होऊ लागली आहे. त्यातच जवळपास एक फूट उंचीचा नवीन सिमेंट रस्त्या तयार करण्यात आला. पण आजुबाजूचा खोलगट भाग तसाच असल्यामुळे तिथे पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती होत आहे. जुन्या आरटीओ आॅफीस परिसरातील आशिष नागपुरे, अनिल नागपुरे, सुनील नागपुरे, हर्षीत नागपुरे, संजय वानखेडे यांच्यासह याच परिसरातील सरकारी क्वॉर्टरमध्ये राहात असलेले निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनाही डेंग्यूची लागण झाली आहे. गजानन मंदीरजवळील निवासी कुवरसिंह बघेले यांनाही डेंग्यूची लागण झाली असून त्यांनाही भर्ती करण्यात आल्याची माहिती आहे. या परिसरातील नाल्या सांडपाण्याने तुडूंब भरल्या असून सफाई होत नसल्याने डासांचा उदे्रक वाढल्याचे आशिष नागपुरे यांनी सांगितले. याबाबत माहिती मिळताच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.सलील पाटील यांनी नगर परिषदेला माहिती देऊन परिसरात सफाई अभियान राबवून फवारणीही केली.
शहरात पाय पसरतोय डेंग्यू
By admin | Updated: October 16, 2014 23:26 IST