गोंदिया : भरधाव ट्रकच्या धडकेत सायकलस्वार ठार झाल्याची घटना आज शनिवार (दि.१७) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा येथे घडली.
मृत व्यक्ती हा सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. तो आज सकाळी सडक अर्जुनी कडे कामावर जात असताना कोहमारा येथील नवेगावबांध रोड चौकात ९.४५ वाजताच्या सुमारास नागपूरकडून रायपूर कडे जात असलेल्या ट्रक क्र.एन एल ०१ एइ ७१३४ च्या ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगात चालवून त्यास धडक दिली. यावेळी तो ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या घटनेची माहिती डुग्गीपार पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. दरम्यान, ट्रक चालकाला ट्रक सह ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.