प्रशासकीय यंत्रणा सज्ज : २५ अर्जांची उचल, पण एकही नामांकन नाहीगोंदिया : भंडारा-गोंदिया विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार का, भाजप-सेनेची युती होणार का हे अद्याप निश्चित झालेले नाही. दुसरीकडे आतापर्यंत २५ अर्जांची उचल इच्छुकांनी केली आहे. मात्र अद्याप एकही नामांकन दाखल झालेले नाही. त्यामुळे दिवसागणिक या निवडणुकीतील उत्सुकता शिगेला पोहोचत आहे.या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ.राजेंद्र जैन यांची तर भाजपकडून परिणय फुके यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. परंतू काँग्रेसनेही आतून तयारी सुरू केली असून प्रफुल्ल अग्रवाल त्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे तिरंगी लढत झाल्यास कोण कोणावर भारी ठरणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २ नोव्हेंबर आहे. ३ नोव्हेंबर रोजी अर्ज छाननी होणार असून अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर आहे. १९ नोव्हेंबर २०१६ रोजी मतदान घेण्यात येईल, तर २२ नोव्हेंबर २०१६ रोजी निकाल जाहीर करण्यात येईल. यामुळे प्रशासकीय स्तरावर यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र राजकीय पक्षांची काय खलबते सुरू आहे याचा थांगपत्ता कोणालाच नसल्यामुळे मतदारही संभ्रमात पडले आहेत. या निवडणुकीसाठी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी असलेले मतदार मतदान करणार आहेत. त्यात गोंदिया जिल्ह्यातील २०० मतदारांमध्ये सर्वाधिक ७० मतदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे ६७ तर तिसच्या क्रमांकावर काँग्रेसचे ४६ मतदार आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड मानले जात आहे. यासोबतच १३ अपक्ष उमेदवारांना यावेळी चांगलाच ‘भाव’ येणार आहे. त्यांना आपल्याकडे खेचण्यात कोण यशस्वी होतो यावरही विजयाचे गणित राहणार आहे.दरम्यान संशयित रोख व्यवहार व बँक व्यवहारांवर आयकर विभागाची नजर आहे. विधान परिषदेसाठी भंडारा-गोंदिया जिल्हयाच्या ग्रामीण व शहरी भागात आचारसंहिता लागू आहे. दोन्ही जिल्हयात भरारी पथके स्थापन करण्यात आली असून तक्रार निवारण कक्ष निर्माण करण्यात येणार आहे. अवैध दारु विक्र ी व डेली स्टॉक नियंत्रित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सोशल मिडीयावरील प्रचारावर पोलीस विभागाच्या सायबर सेलकडून नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी सोशल मिडीयाचा जपून वापर करावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा भंडाराचे जिल्हाधिकारी यांनी केले आहे. विधान परिषद निवडणुकीशी संबंधित संशयित बँक व्यवहार तसेच रोखीचे बँक व्यवहार आयकर विभागाच्या संशयाच्या टप्प्यात असणार आहेत. अशा व्यवहारांची शंका असल्यास पुराव्यानिशी तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले. बॅनर, पोस्टर व जाहिराती तात्काळ काढण्यासंदर्भात नगरपालिका मुख्याधिकारी व खंडविकास अधिकारी यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान नवीन कामांच्या निविदा प्रकाशित करणे, प्रशासकीय मान्यता देणे किंवा भूमीपूजन करणे यावर प्रतिबंध आहे. या निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या ३९५ एवढी आहे. यात जिल्हा परिषद भंडारा ५९, नगर परिषद भंडारा- ३५, नगर परिषद तुमसर- २५, नगर परिषद पवनी-१९, नगर पंचायत मोहाडी-१९, नगर पंचायत लाखनी- १९, नगर पंचायत लाखांदूर-१९ असे भंडारा जिल्हयातील १९५ व गोंदिया जिल्हयातील- जिल्हा परिषद गोंदिया-६१, नगर परिषद गोंदिया- ४४, नगर परिषद तिरोडा-१९, नगर पंचायत गोरेगांव-१९, नगर पंचायत सडक अर्जुनी -१९, नगर पंचायत देवरी-१९ व नगर पंचायत अर्जुनी/मोरगाव- १९ असे एकूण १९८ स्थानिक प्राधिकारी संस्थेचे सदस्य मतदार आहेत. या निवडणुकीसाठी गोंदिया जिल्हयात तहसील कार्यालय सडक अर्जुनी व मनोहर नगर परिषद हायस्कूल गोंदिया येथे प्रारूप मतदान केंद्र राहणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
उमेदवारीवरून उत्सुकता शिगेला
By admin | Updated: October 28, 2016 01:17 IST