सिरपुरबांध : येथील सीमा तपासणी नाक्यावर लावण्यात आलेल्या सिमेंट बॅरीकेटवर आदळून ट्रेलर दुर्घटनाग्रस्त झाला. यामध्ये एमएच ४०/१५६९ या ट्रेलरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने जिवीत हाणी टळली. या ठिकाणी सीमा तापसणी नाक्यावर सुरक्षेसाठी ठेवण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांचे पार्इंट रस्त्यालगत असल्याने त्यांना जीव मुठीत घेऊन ड्युटी करावी लागत आहे. या ठिकाणी छोटे-मोठे अपघात नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे या ठिकाणाला मानवनिर्मित अपघातस्थळ म्हणण्यात वावगे ठरणार नाही.या ठिकाणी लावण्यात आलेल्या सिमेंट बॅरीकेटला अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे गाड्या धडकत असतात. महागड्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. आणि याला कारणीभूत सीमा तपासणी नाक्यावर सेवा देत असलेल्या सद्भाव कंपनीचा भोंगळ कारभारच असल्याचे बोलले जाते. या मार्गावरुन दिवसाकाठी आठ ते दहा हजार गाड्यांची वर्दळ होते. या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात सुरक्षेसंबंधी व्यवस्था नसल्याने अपघात घडत असतात. कंपनीने या नाक्यावर योग्य ती सुरक्षेची व्यवस्था करावी जेणेकरून अपघात होणार नाही, तसेच येथे सिमेंटऐवजी प्लास्टीकचे बॅरीकेट लावण्यात यावे, जेणेकरून वाहनांचे नुकसान होणार नाही अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर)
तपासणी नाक्यावर ट्रेलर दुर्घटनाग्रस्त
By admin | Updated: April 18, 2017 01:08 IST