मुरलीदास गोंडाणे इंदोरा बु.तिरोडा पं.स. अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत बिहीरिया येथे सरपंच-उपसरपंच यांनी ग्रामपंचायत निधीचा स्वमर्जीने अफरातफर केला व खोटे बिल दर्शविले. यात त्यांनी लाखो रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ग्रा.पं. सदस्य रतिराम मराठे, प्रदीप पटले, निशा पानतोने, जिरन ठाकरे यांनी केला आहे.गावातील कामाच्या संदर्भात व खर्चाबाबत माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली. त्यात सरपंच अनिता मराठे व उपसरपंच मदन पटले यांनी मनमर्जीने ग्राम समृद्धी योजना व महात्मा गांधी तंटामुक्त योजनेचा शासकीय निधी उधळपट्टी करून खोटे बिल दर्शविल्याचे दिसून आले. याबाबत ग्रा.पं. सदस्य रतिराम मराठे यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी गोंदिया, खंडविकास अधिकारी तिरोडा यांना तक्रार केली. मात्र कारवाई शून्य असल्याचे सांगण्यात येते.शासनामार्फत ग्राम समृद्धी योजनेंतर्गत तीन लाख रूपये मंजूर करण्यात आले होते. ही निधी खर्च करण्यासाठी ग्रामसभेच्या तहकुब सभेत सचिवाने ठराव घेऊन निधी खर्च करण्याचे दर्शविले आहे. यात वृक्षारोपण करणे, गावात मुरूम पसरविले, सौर ऊर्जेचे दिवे लावणे, ग्रामपंचायत समोर सिमेंट रस्ता तयार करण्याचे नमूद आहे. मात्र निधीचा विल्हेवाट लावताना दोन लाख ५९ हजार ८८१ रूपये खर्च करण्यात आले. वृक्षारोपणासाठी झाडे खरेदी करताना एमआरईजीएस अंतर्गत नर्सरीमधून झाडे खरेदी करण्याऐवजी भगत नर्सरी गोंदिया येथून झाडे आणल्याचे दाखविण्यात आले. तंटामुक्त योजनेच्या फंडामध्ये सन २०१२-१३ मध्ये प्रचार-प्रसिद्धीवर आठ हजार रूपये, अंगणवाडी सफेदीवर पाच हजार रूपये, ग्रा.पं. कार्यालयावर १८ हजार ९६६ रूपये असे एकूण ३१ हजार ९७७ रूपये खर्च दाखविण्यात आले. याच फंडात सन २०१३-१४ मध्ये नळ योजना साहित्य खरेदी पाच हजार रूपये, प्रचार-प्रसिद्धी ४० हजार ५२५ रूपये, बुक व खुर्ची खरेदी ३८ हजार ६८५ रूपये, विहिरींतून गाळ काढणे दोन हजार ५०० रूपये, सौर दीप खरेदी २८ हजार ८७० रूपये, प्रशासकीय खर्च ११ हजार ८७० रूपये, वैयक्तिक प्रोत्साहन बक्षीस १५ हजार ३०० रूपये, असे एकूण एक लाख ४२ हजार ६८७ रूपये खर्च दाखविण्यात आले. पर्यावरण ग्राम समृद्धी योजनेंतर्गत सन २०१३-१४ मध्ये चेकबुक ६८ रूपये, सौर पथदीप ७० हजार ४१४ रूपये, वृक्षारोपण १ लाख ४९ २७० रूपये, दळणवळण खर्च ४० हजार १२८ रूपये असे एकूण २ लाख ५९ हजार ८८१ रू्ये खर्च करण्यात आले आहेत. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांनी आपल्या मनमर्जीने शासकीय निधीचा खुलेआम दुरूपयोग केला असून सर्व बोगस बिल लावण्यात आले आहेत. या संदर्भात लेखी तक्रार मुख्य कार्यपालन अधिकारी, खंडविकास अधिकारी तिरोडा, विस्तार अधिकारी गिऱ्हेपुंजे यांना देण्यात आली. परंतु चार महिन्यांचा काळ निघून गेल्यावरही कुलहीच कारवाई किंवा चौकशी करण्यात आली नाही. विस्तार अधिकारी गिऱ्हेपुंजे यांनी २७ जानेवारी २०१५ रोजी चौकशी केली. परंतु अजूनपर्यंत अहवाल सादर केला नाही व तक्रारकर्त्यांना माहितीसुद्धा दिली नाही. सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी पदाधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून रिकव्हरी करून न्याय देण्यात यावे, अशी मागणी तक्रारकर्ते ग्रा.पं. सदस्यांची आहे. ५० हजारांची झाडे बेपत्ताझाडे खरेदीत अनारची २८ झाडे एक हजार ४०० रूपये, चिकू २०० झाडे १८ हजार रूपये, बोर २५ झाडे तीन हजार रूपये, अशोक १०० झाडे तीन हजार रूपये, शोभिवंत २३ झाडे चार हजार ६०० रूपये असे एकूण ३० हजार रूपये खर्च. सुधारित आंबा २५० झाडे १६ हजार २५० रूपये, निंबू १५ झाडे ७५० रूपये, अशोक १०० झाडे तीन हजार रूपये असे एकूण २० हजार रूपये. झाडे खरेदीवर ५० हजार रूपये खर्च दाखविण्यात आले आहे. ही ५० हजारांची झाडे आजघडीला कुठे लावले आहेत, याचा पत्ताच नाही. ग्रा.पं. भवनाच्या पटांगणाशेजारी केवळ २० ते २५ वृक्ष आहेत. बाकीची झाडे बेपत्ता आहेत.खड्डे व ट्रीगार्डचे बोगस बिलवृक्षारोपणाचे खड्डे खोदण्यासाठी केवळ चार तास जेसीबी मशीनद्वारे खोदकाम करण्यात आले. मात्र बिलामध्ये २६ तास खोदकाम व २१ हजार ४५० रूपये खर्च दाखविण्यात आले आहे. खोदकाम केलेल्या जागेचा सात-बारा उतारा जोडण्यात आला नाही. २६ तास खोदकाम कुठे केले ती जागासुद्धा अस्तित्त्वात नाही. याचेही बोगस बिल दर्शविण्यात आले आहे. झाडांसाठी लोखंडी ट्रीगार्डच्या नावे १०० ट्रीगार्ड खरेदीसाठी ३९ हजार ३३० रूपये दाखविण्यात आले. मात्र हे ट्रीगार्ड कुठे आहेत? जमिनीत गायब झाली तर नाही, याचा शोध घेणे आवश्यक आहे.सौर पथदीप व मुरूम खरेदीत घोळसौर ऊर्जेचे दिवे खरेदीसाठी प्रति नग २८ हजार ७८० रूपयांप्रमाणे दोन नग खरेदीसाठी ५७ हजार ७४० रूपयांचे बिल जोडले आहे. मात्र जमाखर्च रजिस्टरमध्ये ७० हजार ४१४ रूपये सन २०१३-१४ मध्ये जमाखर्च गोषवारा नोंद आहे. तंटामुक्त समितीचे जमाखर्च हिशेबात २८ हजार ८७० रूपयांचे सौर ऊर्जा खरेदी बिल दाखविण्यात आले आहे. गावात मुरूम पाच ते १० ट्राली घालण्यात आले. परंतु बिलामध्ये ५१ ट्राली मुरूमासाठी ३८ हजार २८ रूपये दाखविण्यात आले आहे.बांबू व लोखंड खरेदीचे गौडबंगाल झाडांच्या कुंपणासाठी १०० बांबू खरेदीचे बिल दर्शविले आहे. १०० बांबूंची किंमत १० हजार रूपये व आणण्याचे भाडे ५०० रूपये असे एकूण १० हजार ५०० रूपये दर्शविण्यात आले आहे. बिल चौधरी ट्रेडर्स काचेवानीचे (तिरोडा) असून बिलात १०० नग दर्शविले असून दर १० रूपये आहे. याची किंमत एक हजार रूपये होते. परंतु चक्क १० हजार ५०० रूपये नोंदवून व्हाऊचर-८ २४ जुलै १३ ला पे करण्यात आले. ग्रामपंचायत समोरील सिमेंट रस्ता बांधकामात लोखंड घालण्यात आले नाही. परंतु दोन क्विंटल लोखंड खरेदीसाठी १० हजार ९०० रूपयांचे बिल दाखविण्यात आले आहे.सरपंच पती व उपसरपंचाचे वडीलवृक्षारोपणाच्या कामावरील मजूरवृक्षारोपणासाठी नमुना २२ वर मजुरांची हजेरीपट दाखविले आहे. ९१ दिवस मजुरी प्रति दिवस १५० रूपयांप्रमाणे दाखविण्यात आले आहे. यात ओंकार रतिराम पटले नामक एका मजुराचे नाव आहे. परंतु ओंकार पटले नावाचा इसम गावातच नाही. नमुना २२ वर सरपंचाचे पती संजय मराठे व उपसरपंचाचे वडील डुलिचंद नारायण पटले यांची नावे नोंद असून मजुरीची रक्कमही उचल केली आहे.
ग्रा.पं.चा भ्रष्टाचार चव्हाट्यावर
By admin | Updated: March 16, 2015 00:07 IST