गोंदिया : गोंदिया तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने या तालुक्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (दि.२६) याच तालुक्यात ५४ कोरोना बाधितांची नोंद झाल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३१५ वर गेली आहे. संसर्गात झपाट्याने वाढ होत असल्याने तालुकावासीयांनी वेळीच दक्ष होत काळजी घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी ९६ कोरोना बाधितांची नोंद झाली तर ५० बाधितांनी कोरोनावर मात केली. तिरोडा तालुक्यातील एका ७० वर्षीय रुग्णाचा उपचारा दरम्यान येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत एकूण १८८ कोरोनाचे बळी गेले आहे. शुक्रवारी आढळलेल्या ९६ बाधितांमध्ये सर्वाधिक ५४ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा १४, गोरेगाव ४, आमगाव ८, सालेकसा ३, देवरी ४, सडक अर्जुनी ४, अर्जुनी ४ आणि बाहेरील जिल्ह्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ९९७४२ जणांचे नमुने स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ८६९५३ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत ८५०७९ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ७८५७८ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १५५२६ कोरोना बाधित आढळले असून यापैकी १४६१५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ६२३ कोरोना ॲक्टीव्ह रुग्ण असून ३६८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
.............
कोराेनाचा रिकव्हरी दर झाला कमी
मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा रिकव्हरी दर जवळपास २ टक्क्यांनी कमी झाला आहे. सध्या जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी दर ९४.७४ टक्के आहे. त्यामुळे चिंतेत थोडी वाढ झाली आहे.
..................
जिल्हावासीयांनो वेळीच काळजी घ्या
जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोक वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना बाधितांचा ग्राफ पुन्हा वाढत असल्याचे चित्र आहे. वाढता संसर्गाची बाब गंभीरपणे घेत स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घ्या, मास्क, सॅनिटायझर यांचा नियमित वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे अंमलबजावणी करुन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे काटेकोरपणे पालन करा.
...