गोंदिया : कोरोना रुग्णवाढीला जिल्ह्यात बऱ्यापैकी ब्रेक लागला आहे. रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असल्याने बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १२७ वर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातून कोरोना लवकरच हद्दपार होण्याची शक्यता आहे. ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे. जिल्हावासीयांनी थोडी काळजी आणखी घेतल्यास जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही.
जिल्ह्यात सोमवारी (दि.२५) ९ कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर १५ कोरोनाबाधितांनी मात केली. तिरोडा तालुक्यातील एका कोरोनाबाधिताचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी आढळलेल्या ९ बाधितांमध्ये गोंदिया तालुक्यातील ३, तिरोडा ३, सालेकसा तालुक्यातील २ रुग्णांचा आणि बाहेरील राज्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ६३६१९ जणांचे स्वॅब नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ५२०३७ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शाेध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत ६४४७१ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ५८३९५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४१२५ कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी १३८१६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत १२७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर २४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.