पीक वाढले जोमाने : भातखाचरे दुरूस्ती कामावर विशेष जोरतिरोडा : तालुक्यातील बेरडीपार खुर्द या गावाची चालू वर्षी २०१५-१६ साठी जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड करण्यात आली होती. या अभियानाचा फायदा घेऊन सदर गावाने स्वत:चा कायापालट करून घेतला. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बेरडीपार खुर्द गावी मुख्यत: भात खाचरे दुरूस्तीच्या कामावर विशेष जोर देण्यात आला होता. गाव सहभागातून चांगल्या प्रकारे काम पार पडले. शेतकऱ्यांच्या अती लहान तसेच मध्यम बांध्याचे मोठे बांध तयार झाले. त्यामुळे चालू हंगामामध्ये त्या भात खाचरात चांगल्या प्रकारे पाणी जमा झाले. सुरूवातीचे पाणी चांगल्या प्रकारे जमा होऊन जागीच जमिनीत मुरले. त्यामुळे जमिनीची चांगल्याप्रकारे वापसा स्थिती तयार होऊन भाताचे पीक चांगल्या जोमाने वाढण्यास मदत झाली. चालू हंगामात धान पिकांचे २० टक्के अधिक उत्पादन वाढले. तसेच २०-२५ टक्के पाण्याचीसुद्धा बचत झाली. म्हणजेच कमी पाणी उपलब्ध होऊनही उत्पन्न वाढलेले आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे बांधाचे आकारमान वाढलेले आहे. त्यामुळे पूर्वी कधीच त्या भागात न पेरलेले तुरीचे उत्पादन चालू वर्षात खूप वाढलेले आहे. या बांधावर तुरी चांगल्या प्रकारे वाढल्या व उत्पादन चांगले आले म्हणून हे अधिकचे पीक शेतकऱ्यांना वरदान ठरले आहे. बेरडीपार खुर्द गावाचे तसेच या भागातील धानाचे व तुरीचे उत्पादन वाढविण्यात तिरोडा येथील तालुका कृषी अधिकारी पी.व्ही. पोटदुखे यांचे विशेष मार्गदर्शन मोलाचे ठरले. त्यामुळे गावातील व आजसपासच्या परिसरातील धानाचे व तुरीचे उत्पादन वाढल्याचे सांगण्यात आले.(शहर प्रतिनिधी)तुरीचे उत्पादन वाढले रमेश साठवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, मागील १० वर्षांत आमच्या गावात अशाप्रकारे धानाचे व तुरीचे उत्पादन कधीच आले नव्हते. त्यामध्ये कृषी विभागाचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी आमच्या बांधावर माती टाकून दिली. त्यामुळे यावर्षी चांगले पाणी थांबून आमचे धानाचे उत्पादन वाढले. त्याच बांधावर आम्ही यावर्षी तुरीची लागवड केली. आतापर्यंत मागील दहा वर्षात आम्ही तेथे तुरी लावल्या नव्हत्या. या वर्षी तेथे तुरी लावून आम्ही चांगले उत्पादन घेत आहोत.
जलयुक्त अभियानातून गावाचा कायापालट
By admin | Updated: October 31, 2015 02:41 IST