गोंदिया : राज्य शासनाने नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पासाठी विशेष व्याघ्र सुरक्षा दलाचे गठन करण्यासाठी हिरवी झेंडी दाखविली आहे. याबाबत नुकताच एक अध्यादेश राज्य शासनाने जाहीर केला आहे. त्यानुसार नवेगाव-नागझिरा व मेळघाट या दोन्ही व्याघ्र प्रकल्पाकरिता विशेष व्याघ्र सुरक्षा दल गठित करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या ६ आॅगस्ट २०१४ च्या पत्रानुसार विचाराधिन होता. ८ एप्रिल २०१५ रोजी उच्चस्तरीय सचिव समितीने सदर प्रस्तावाला विधीवत मंजुरी प्रदान केली. सन २०१५-१६ पासून विशेष व्याघ्र सुरक्षा दल तयार करण्याचा मार्ग सुगम झाला आहे.नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पासाठी ११२ पदांची निर्मिती करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले आहेत. त्यानुसार एक सहायक वनसरंक्षक दर्जाचा अधिकारी असेल. तीन वनपरिक्षेत्र अधिकारी नियुक्त करण्यात येतील. याशिवाय ८१ वनरक्षक व २७ वन निरीक्षकांची भरती करण्यात येईल. वनरक्षक व वन निरीक्षकांच्या पदांची नवीन भरती होण्याची शक्यता आहे. पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाच्यावतीने २० फेब्रुवारी रोजी एक अधिसूचना जाहीर करण्यात आली. यात नागझिरा वन्यजीव अभयारण्य, नवीन नागझिरा वन्यजीव अभयारण्य, कोका वन्यजीव अभयारण्य व नवेगाव राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्राला संवेदनशील घोषित करण्यात आले. त्यानुसार दोन वर्षांच्या कालावधीत व्याघ्र आरक्षिती योजना कार्यान्वित करण्यात येईल. तसेच सहा महिन्यांच्या आत झोनल मास्टर प्लान बनविण्याचे निर्देश दिले आहेत. काही उद्योगही स्थापित केले जावू शकतात.
विशेष व्याघ्र सुरक्षा दलाचे गठन
By admin | Updated: April 26, 2015 01:09 IST