गोंदिया : ककोडी येथील जि.प. हायस्कूलमध्ये सन २०१२ पासून रेखा ठवरे या मुख्याध्यापिका आहेत. त्या दोन वर्षापासून शाळेच्या आर्थिक व प्रशासकीय व्यवहारात कसूर करीत आहेत. तसेच त्यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेचे आयोजनही केले नाही. या आशयाची तक्रार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी जि.प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकारी तसेच जि.प. चे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना केली आहे.शाळा व्यवस्थापन समितीची सभा न घेणे व शाळेच्या आर्थिक तसेच प्रशासकीय व्यवहारात कसूर करणे याबाबत मुख्याध्यापिका रेखा ठवरे यांची तक्रार आठ महिन्यांपूर्वी व्यवस्थापन समितीच्याच पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे केली होती. मात्र जिल्हा परिषदेच्या वतीने अद्यापही चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे शाळेच्या आर्थिक व प्रशासकीय कार्यांवर प्रश्न निर्माण झाले आहेत. सदर मुख्याध्यापिका व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता स्वत:च्याच मनमर्जीने कार्यभार सांभाळत आहेत. दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी कोणत्याच प्रकारची सभा घेतली नाही. मात्र आता चौकशी होणार आहे म्हणून त्यांनी सदस्यांच्या घरी जावून सह्या घेतल्या. संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याकरिता एप्रिल महिन्यात जि.प.चे अधिकारी आले होते. त्यांच्या समोर समितीच्या लोकांचे बयान नोंदविण्यात आले. परंतु चार-पाच महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा मुख्याध्यापिकेची चौकशी करण्यात आली नाही. शाळेमध्ये चार शिक्षक व एक चपराशीचे पद रिक्त आहेत. त्यासाठी समितीच्या माध्यमातून ठराव पाठविणे अपेक्षित होते. परंतु सदर मुख्याध्यापिकेच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे मोठेच नुकसान होत आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची एकही सभा न घेणे, शाळेमध्ये व्हिजित बुक नसणे, विद्यार्थ्यांचे बोर्ड परीक्षा शुल्क वाटप न करणे, शिष्यवृत्ती वाटप न करणे, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अनुदान योग्य मार्गी न लावणे आदी आक्षेप समितीने मुख्याध्यापिकेवर घेतले आहेत. तसेच यावर्षी साहित्य खरेदीसाठी शाळेला एक लाख २० हजार रूपये मिळाले होते. परंतु मुख्याध्यापिकेच्या निष्काळजीपणामुळे सदर रक्कम परत गेली. या सर्व बाबींवरून संबंधित मुख्याध्यापिका प्रशासकीय व आर्थिक कार्य सांभाळण्यासाठी अयोग्य आहे. त्यामुळे त्यांचा कार्यभार काढण्यात यावा, अन्यथा समितीचे पदाधिकारी व गावकरी आंदोलनाचा मार्ग अवलंबतील, असा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
व्यवस्थापन समितीने केली मुख्याध्यापिकेची तक्रार
By admin | Updated: October 25, 2014 01:33 IST