गोंदिया : बर्ड फ्लूच्या नावावर निंबा येथील श्रुतीज ब्राॅयलर या फार्ममधील ८ हजार ६६२ कोंबड्या खड्ड्यात पुरण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी दिले. त्याची नुकसानभरपाई देण्यात यावी, अन्यथा मलाच खड्ड्यात पुरा, अशा इशारा शेतकरी शशांक रामचंद्र डोये यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.
निंबा येथून एक किमी अंतरावर बर्ड फ्लूने एका कावळ्याचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. तो अहवाल भोपाळ येथील प्रयोगशाळेने दिल्यानंतर निंबा येथील श्रुतीज ब्रायलर या फार्ममधील कोंबड्या खड्ड्यात पुरण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी दिले होते. त्यांच्या आदेशावरून ८ हजार ६६२ जिवंत कोंबड्या खड्ड्यात पुरण्यात आल्या. त्या कोंबड्यांचे प्रति नग सरासरी वजन १ किलो ९०० ग्रॅम एवढे होते. त्यांना लागलेला दाणा, व्हॅक्सिन, चुना, कोंडा, मजुरी, इलेक्ट्रिक, औषध आदी असा प्रतिपक्षी १४० रुपये याप्रमाणे १२ लाख १२ हजार ६८० रुपये तसेच आपल्या आदेशानुसार तीन महिने फार्म बंद ठेवणे यांचा मजूर, इलेक्ट्रिक खर्च, फार्मचे पडदे, कोंडा आदी सामान नष्ट करण्यात आले. त्याचा पूर्ण खर्च अंदाजे २ लाख ५० हजार रुपये एवढे नुकसान झाले. याप्रकरणी १४ लाख ६२ हजार ६८० रुपयांचे नुकसान झाले आहे. माझ्या संपूर्ण कोबड्यांचा खर्च व आमच्या सामानांची नुकसानभरपाई, इलेक्ट्रिक बिल आणि पुनश्च फार्म सुरू करण्याच्या आदेशापर्यंत लागणारा खर्च देण्यात यावा, हा निर्णय १५ दिवसांच्या आत घेण्यात यावा, अन्यथा स्वत:ला संपवण्याशिवाय माझ्या जवळ दुसरा कुठलाही मार्ग नाही. हे सर्व शक्य नसल्यास मलासुध्दा खड्ड्यात पुरून माती टाकण्याचे आदेश देण्यात यावे, असा इशारा श्रुतीज ब्रायलर फार्मचे संचालक शेतकरी शशांक रामचंद्र डोये यांनी जिल्हाधिकारी यांना ८ फेब्रुवारी रोजी दिलेल्या दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
बॉक्स
पाहणी न करताच दिले मारण्याचे आदेश
श्रुतीज ब्रायलर या फार्ममध्ये बर्ड फ्लूने मरतूक नव्हती. नेहमीप्रमाणे १३ ते १४ टक्के मरतूक ३६ दिवसांत होती. ही मरतूक नेहमीच असते; परंतु फक्त भोपाळच्या रिपोर्टवरून जिवंत पक्षी पुरण्यात आले. या पोल्ट्रीची पुनश्च तपासणी करण्याकरिता प्रत्यक्ष भेटून विनंती केली असता लक्ष न देता लगेच पक्षी पुरण्याचे आदेश देण्यात आले हा माझ्यावरील अन्याय असल्याचे शशांक डोये म्हणाले.