गोंदिया : विजेचा घरगुती वापर करण्यासाठी घेण्यात आलेल्या मीटरचा व्यावसायिकांकडून खासगी प्रतिष्ठान, आस्थापनांसाठी सर्रासपणे वापर होत आहे. या प्रकारामुळे महावितरणला लाखो रुपयांचा चुना लागत आहे. मात्र, त्यानंतरही या प्रकाराची महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून दखल घेतल्या जात नाही. वीजचोर ग्राहकांशी अधिकाऱ्यांचे तर साटेलोटे नाही ना, अशी शंका यातून बळावली आहे. गोंदिया शहरात विविध प्रकारच्या अनेक खासगी प्रतिष्ठानांमध्ये घरगुती वीज मीटर लागले आहे. प्रशिक्षण वर्ग, शिकवणी वर्ग, कॉन्व्हेंट, किराणा दुकाने, खासगी दवाखाने, बाजारपेठेतील व्यापारी प्रतिष्ठाने आदींचा यात समावेश आहे. अशा प्रतिष्ठाणांसाठी स्वतंत्रपणे व्यावसायिक वीज जोडणी घेणे आवश्यक असते. या वीज जोडणीचे दर महाग असतात; परंतु यातून स्वत:ला वाचविण्यासाठी अनेक लघु व्यावसायिक घरगुती वीजजोडणीचाच वापर करून महातिवरणला दर महिन्याला लाखो रुपयांचा चुना लावत आहेत. काही महाभागांनी त्यांचे बिंग फुटू नये म्हणून नावालाच व्यावसायिक वीजजोडणी करून घेतली; परंतु प्रत्यक्षात घरगुती मीटरचाच वापर केला जात आहे. असे प्रकार सुरु असतानाही महावितरणकडून या संदर्भात शोध मोहिम सुरू करून कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे या वीजचोरांचे चांगलेच फावले आहे. घरगुती वीजेचा घरासाठीच वापर करणाऱ्या ग्राहकांनी वीज मीटरमध्ये बिघाड असल्याची तक्रार केली तर त्याची सहजपणे दखल घेतली जात नाही. मीटर योग्य असल्याचे सांगितले जाते. आर्थिक कमकुवततेमुळे ग्राहकाने वेळ मागितली किंवा वेळेत त्या बिलाचा भरणा केला नाही, तर सदर कर्मचारी त्यांचे मीटर काढून घेतात. दुसरीकडे बड्या वीज चोरांना मात्र अप्रत्यक्षपणे संरक्षण दिले जात असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)
घरगुती मीटरचा व्यावसायिक वापर
By admin | Updated: January 25, 2015 23:16 IST