नवेगावबांध : भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाने प्रेरीत होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला बुद्ध धर्म दिला. बुद्धाच्या मार्गाचे आचरण करुन समाज दिवसेंदिवस प्रगती करीत आहे. सामाजिक बांधीलकी म्हणून समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येणे आवश्यक आहे. त्यात कालीमाती धम्मकुटी हे सर्वांनाच प्रेरणा देणारे स्थान आहे. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला सर्वच उपासकांनी धम्मकुटीला भेट द्यावी. प्रत्येकाच्याच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्याने येणार्या पाच वर्षात धम्मकुटीला मोठे स्वरुप यायला पाहिजे असे मत आमदार इंजि. राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. ते धम्मकुटी काळीमाती (ता. अर्जुनी/मोर) येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित धम्म सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेंद्र ठवरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रत्नदीप दहिवले, दयाराम भालाधरे, गोठणगावचे सरपंच जनार्धन टेंभुर्णे, जि.प. सदस्य किरण कांबळे, पत्रकार विजय डोये, किशोर शंभरकर, नवलकिशोर चांडक, के.आर. उके, इंजि. यशवंत गणवीर, डॉ. अजय अंबादे, विलास बनसोड, सरपंच व्यंकट खोब्रागडे, दिनेश खोब्रागडे, डॉ. दिपक उके, राहुल रामटेके, प्रदीप गणविर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम आ. बडोले यांच्या हस्ते पंचशिल ध्वजाचे व सुरेंद्र ठवरे यांचे हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तर समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर स्थापीत बुद्धमुर्तीचे पूजन व वंदना ग्रहण करण्यात आली. पुष्पगुच्छांनी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी दहिवले म्हणाले की, दु:खाचं खरं कारण बुद्धाने शोधून काढले. जोपर्यंत मन:शांती होणार नाही तोपर्यंत दु:ख नष्ट होत नाही. नकारात्मकता हा मानवाचा मोठा शत्रू आहे. शांती, बंधुभाव व प्रेमानेच मनातील नकारात्मकता लोप पावत असते. विविध प्रकारच्या कार्यक्रमातून धम्मकुटीचे महत्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे हे प्रत्येक उपासकाचे कर्तव्य आहे. बुद्ध पौर्णिमेनिमित्त होणार्या धम्मसोहळ्याला प्रत्येकाने उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयाराम भालाधरे यांनी मांडले. संचालन पी.एन. जगझापे यांनी केले. आभार डॉ. अजय अंबादे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दि बुद्धीष्ट सोसायटी आॅफ इंडिया, समता सैनिक दल, अर्जुनी/मोर, सडक अर्जुनी व गोरेगाव तालुक्यातील बौद्ध बांधवांनी सहकार्य घेतले. या कार्यक्रमानंतर उपस्थितांना भोजनदास व धम्मरसाचे वाटप देखील करण्यात आले. (वार्ताहर)
येत्या वर्षभरात धम्मकुटीला मोठे स्वरुप यावे- बडोले
By admin | Updated: May 17, 2014 23:45 IST