कर्मचाऱ्यांचे आंदोलन : चार दिवसांपासून महत्त्वाची कामे खोळंबली, नागरिकांची फटफजिती गोंदिया : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद-पंचायत समिती लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने ग्रेड पे मध्ये दुरुस्तीसह इतर १६ मागण्यांसाठी सुरू केलेल्या लेखणीबंद आंदोलनाचा आता सर्वांनाच फटका बसत आहे. जिल्ह्यात १८ जुलैपासून सुरू झालेल्या या आंदोलनात जिल्हा परिषदेसह सर्व आठही पंचायत समित्यांमधील कर्मचाऱ्यांनी कार्यालयात हजर होऊनही कामावर मात्र बहिष्कार टाकल्याने विविध कामांसाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना आल्यापावली परत जावे लागत आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, बालविकास प्रकल्प, पशु आरोग्य विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभाग एवढेच नाही तर सामान्य प्रशासन विभाग इत्यादी कार्यालयांमध्ये गेल्या चार दिवसांपासून कोणतेही काम झालेले नाही. सर्व दैनंदिन व इतर महत्वाची कामे लिपीक वर्गावर अवलंबून असतात. मात्र तोच लिपीकवर्ग आपली लेखणी बंद करुन बसल्याने शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक यांच्यापासून सामान्य जनतेची कामे खोळंबली आहेत. लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. कर्मचाऱ्यांमध्ये रंगताहेत गप्पा सालेकसा : या लेखणीबंद आंदोलनामुळे पंचायत समितीमधील सर्व लिपीकवर्गीय कर्मचारी आपले टेबल सोडून व्हरांड्यात तसेच चहाटपरी, पान टपरीवर गोष्टीत दंग होत आहेत. दुसरीकडे काही कार्यालयांत नागरिकांना मोठा फटका बसत आहे. ज्या १४ मागण्या घेऊन लेखणीबंद आंदोलन केले जात आहे त्यात मुख्य म्हणजे गे्रड पे मध्ये सुधारणा, प्रशासकीय बदलीसंदर्भात अन्यायकारक धोरणात बदल, जॉबचार्ट निश्चित करणे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पाल्याप्रमाणे लिपीकांच्या पाल्यांना शिक्षण सवलत या व इतर मागण्यांचा समावेश आहे. लेखनी बंदसंबंधी माहिती सादर करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी खंडविकास अधिकारी एम.एस. पांडे यांना निवेदन दिले. यावेळी कनिष्ठ सहायक एस.टी. वाजपेयी, सी.एच. सोनकोवर, टी.के. उके, वरिष्ठ सहायक डी.एच. उईके, पी.जी. इळपाते, आर.एन.चौधरी, आर.एम. चौधरी, व्ही.पी. रहतुरिया, पी.एम. दरवडे, आर.एस. आत्राम सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी) ग्रामसेवक-ग्रामविकास अधिकाऱ्यांचे असहकार तिरोडा: महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना शाखा तिरोडाअंतर्गत पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामसेवकांनी धरणे देऊन आंदोलन केले. मागील तीन वर्षापासून असलेल्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यात आली होती, पण शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. ग्रामविकास अधिकारी या पदावरुन विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती देणे, ग्रामसेवकांना ग्रामविकास अधिकारी पदावर पदोन्नती देणे, सुधारित वेतनश्रेणी लागू करणे, २४ वर्षाची कालबद्ध वेतनश्रेणी मंजूर करने, नोव्हेंबर २००५ पूर्वी लागलेल्या ग्रामसेवकाची सीपीफमध्ये कपात झालेली रक्कम, जीपीफमध्ये जमा व पावती मिळणे, निलंबित ग्रामसेवकाला नियमित घेणे व ३५ टक्के रक्कम देणे, अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या ग्रामसेवकांना शासन निर्णयानुसार ५ टक्के अतिरिक्त मेहनतनामा देणे या विषयांवर असहकार आंदोलन करण्यात आले. यावेळी मागणीचे निवेदन खंडविकास अधिकाऱ्यांमार्फत मुकाअ यांना पाठविण्यात आले. संघटनेचे ओ.के. रहांगडाले, शिवाजी कावडे, ज्योती बिसेन, नारायण चव्हाण, एस.एस. विघाटे, एल.के. रुद्रकार, व्ही.एन. बिसेन, एस.जे.पटले, पी.आर.हटवार, बन्सोड, डोंगरे, कडुलेके, एस.एन. कोनटामे, पी.एम. चव्हाण, सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी) ग्रामीण भागातील नागरिकांना फटका आमगाव : विविध मागण्यांकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी सुरू असलेल्या जि.प.-पं.स. लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या लेखणीबंद आंदोलनाला चार दिवस झाले तरी शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. याचा फटका ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना बसत आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी गुरूवारी आमगाव पंचायत समितीच्या आवारात कर्मचाऱ्यांनी निर्दशने केली. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी, अधीक्षक, वरिष्ठ व कनिष्ठ सहायक सहभागी झाले होते. यासाठी संजय बनकर, मंजुषा चौधरी, यु.टी. मानकर, डी.एस. गोदे, एस.एच. तिघारे, आर.एच. रहांगडाले, बी.के. फुकडे, बी.के. रणदिवे, एल.बी. कटरे, एल.एस. ठाकरे, वाय.आर. कोहळे, एस.एस. कडवे, एस.आर.देशमुख, एस.एस. गिरी, आर.एस.नेवारे, व्ही.एन. वरखडे, आर.जी. महारवाडे यांनीपुढाकार घेतला. नागरिक आपल्या कामानिमित्त पंचायत समितीमध्ये चकरा मारत आहेत. परंतु कर्मचाऱ्यांची लेखणी बंद असल्यामुळे नागरिकांची कामे प्रलंबित आहेत. या आंदोलनामुळे शैक्षणिक कामे, पंचायत विभागातील कामे, बांधकाम, रोजगार, कृषी या विभागातील कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे नागरिकांना दररोज रिकाम्या हाताने या विभागामधून परत जावे लागत आहे. (शहर प्रतिनिधी)
जि.प.सह पं.स.मध्येही ‘लेखणी बंद’
By admin | Updated: July 22, 2016 02:32 IST