स्त्यावर पडलेले खड्डे बुजवा
गोरेगाव : शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात उखडलेले असून, त्यावर खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात त्यामुळे नागरिकांना रहदारीला फारच त्रास होतो. अशात मात्र रस्त्यांच्या या दुर्गतीमुळे अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. खड्ड्यांमुळे कित्येकदा अपघात घडले आहेत. नगरपरिषदेने याकडे लक्ष देत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची गरज आहे.
पिकाच्या संरक्षणासाठी झटका मशीन वरदान
नवेगावबांध : ज्या शेतकऱ्यांच्या पिकांची वन्यप्राण्यांपासून नासाडी होत आहे, अशा शेतकऱ्यांना झटका मशीन म्हणजे एक वरदानच आहे. तरी शेतकऱ्यांनी या झटका मशीनचा वापर पिकांच्या संरक्षणासाठी करावा, असा सल्ला माती परीक्षण केंद्राचे जिल्हा नियंत्रण अधिकारी आर. एम. रामटेके यांनी दिला आहे.
वातावरणातील बदलामुळे भीती
अर्जुनी-मोरगाव : कोरोना विषाणू महामारीचे संकट डोक्यावर घोंगावत असतानाच अचानक होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखीसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
कोरोनामुळे विकासाची घडी विस्कटली
पांढरी : गावविकास करण्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे स्त्रोत असलेले प्रमुख माध्यम मालमत्ता, पाणी व दिवाबत्ती कर जमा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, मार्च महिन्यापासून आजपर्यंत ९ महिन्यांचा कालावधी संपला असून, कराची रक्कम ग्रामपंचायतीला कोरोनाच्या प्रभावामुळे वसूल करता आली नाही. त्यामुळे गावविकासाची घडी विस्कटल्याचे चित्र आहे.
कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी
सडक - अर्जुनी : मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ६ वर कोहमारा गाव आहे. मात्र कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची कुठलीही सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. येथे प्रवासी निवारा देण्याची मागणी केली जात आहे.
स्वत:च्या घरकुलाचे स्वप्न होणार साकार
तिरोडा : सर्वांसाठी घरे-२०२० हे केंद्र सरकारचे महत्त्वाचे धोरण असून, राज्य शासनानेदेखील या धोरणाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे आता नागरिकांचे स्वत:च्या घरकुलाचे स्वप्न साकार होत असल्याचे दिसत आहे.
बीएसएनएलचे दुर्लक्ष
आमगाव : बीएसएनएलमार्फत इंटरनेट ब्रॉडबँड सेवा पुरविली जात असून, ग्राहकांच्या तक्रारींकडे मात्र दुर्लक्ष आहे. त्यामुळे मात्र ग्राहकांत रोष व्याप्त आहे.
कचरापेट्यांअभावी दुर्गंधी बळावली
सालेकसा : येथील विविध वॉर्डात नगरपंचायतीच्यावतीने कचरापेट्या ठेवण्यात न आल्याने ठिकठिकाणी कचरा पसरलेला दिसतो. कचऱ्यामुळे किड्यांचा प्रकोप वाढला असून, आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.
बँकेत दलालामार्फत सर्वसामान्यांची लूट
सौंदड : तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तत्काळ होत असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे.
पोलीस विभागाने सुरू केले वाचनालय
अर्जुनी-मोरगाव : भरनोली येथे प्रभारी बसुराज चिटे व उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी या भागातील पदवीधर बेरोजगारांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी ‘दीपस्तंभ’ वाचनालय सुरू केले आहे.
राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ
देवरी : चौपदरीकरण झालेला राष्ट्रीय महामार्ग शहरातून गेला आहे. जवळपास २ कि. मी. पर्यंतच्या महामार्गावर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान, या मार्गावरून भरधाव वाहनांची वर्दळ सतत असते.
नेटवर्कअभावी नागरिक झाले त्रस्त
देवरी : विविध शासकीय कार्यालयातील कामकाजांसह खासगी कंपनी कार्यालयातील कामे ऑनलाईन सुरू आहेत. त्यामुळे मोबाईलचा वापरही वाढला आहे. मात्र आता नेटवर्कअभावी नागरिक त्रस्त झाले आहेत. ही समस्या गत आठ ते दहा वर्षांपासूनची आहे. दुरूस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
रासायनिक भाज्यांमुळे आजारात वाढ
सौंदड : शेतकरी रासायनिक खाताचा वापर करीत असल्यामुळे सुपीक शेतीवर परिणाम होऊ लागला आहे. शेतीत अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतांसोबत दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे. यामुळे रासायनिक भाज्यांमुळे आजाराच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
ग्रामीण भागात अवैध व्यवसाय जोमात
गोंदिया : मोहाडी तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध धंदे फोफावले आहेत. काही महिन्यांपासून या परिसरात रेती वाहतूक, जनावरांची अवैध वाहतूक, दारू, जुगार व गुटखा विक्री अशा अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढला आहे. कारवाईची मागणी होत आहे.
रस्त्यावरील झुडपे अपघाताला कारणीभूत
अर्जुनी-मोरगाव : राज्य मार्गालगत वाढलेली झुडपे, वनस्पती अपघातास कारणीभूत ठरत आहेत. वळणाच्या ठिकाणी असलेल्या या झुडपांमुळे वाहन दिसत नाही. तुमसर ते कटंगी महामार्गावर असाच अपघात होऊन तिघांना आपले प्राण गमवावे लागले.