पोटनिवडणुकीतील तक्रार : पोलीस अधीक्षकांना निवेदन सादरआमगाव :बनगाव येथील २४ आॅगस्टला पोटनिवडणुकीतील मतदान सुरू असताना पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी ग्रामपंचायत सदस्य व बाजार समिती संचालक मनोज (बाळा) चव्हाण अपमानित केले. यामुळे पोलीस निरीक्षक सांडभोर यांच्याविरुद्ध नागरिकांनी रोष व्यक्त केले. भाजप आमगावने सदर घटनेचा निषेध नोंदवून सांडभोर यांच्यावर कारवाईसाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले.बनगाव येथे एक सदस्य पदासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. प्राथमिक शाळा बनगाव येथे मतदान सुरू होते. यावेळी मतदार व पक्ष कार्यकर्त्यांची वर्दळ मतदान केंद्रासमोर होती. मतदान सुरळीतपणे सुरू होते. परंतु दुपारी २ वाजता पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर मतदान केंद्र परिसरात आले. यावेळी मतदान केंद्रापासून लांब अंतरावर मित्रांसोबत चर्चा करीत असलेले मनोज (बाळा) चव्हाण यांना पोलीस निरीक्षकांनी कोणतीच विचारपूस न करता त्यांची कॉलर पकडून दोनशे मीटर अंतरावर असलेल्या पोलीस वाहनात कोंबले. या कृत्यामुळे सर्वच आवाक झाले. तसेच सरपंच व नागरिकांनी पोलीस निरीक्षकांना मनोज चव्हाण यांच्याबद्दल माहिती देत त्यांना सोडविण्यास सांगितले. यावर पोलीस निरीक्षकांनी त्यांना सोडले.पोलीस निरीक्षकाने केलेल्या अमानवीय कृत्यामुळे नागरिक व लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र रोष आहे. घटनेची दखल घेत भाजप तालुका मंडळाने निषेध नोंदवित पोलीस निरीक्षक सांडभोर यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी पोलीस अधीक्षकांना त्यांच्या कार्यालयात निवेदन दिले व सदर घटनेसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक दिलीप पाटील-भुजबळ यांनीकारवाईचे आश्वासन दिले. या वेळी यशवंत मानकर, जयप्रकाश शिवणकर, प्रा. काशिराम हुकरे, नरेंद्र बाजपेयी, राकेश शेंडे, राजू पटले, घनशाम अग्रवाल, क्रीष्णा चुटे, कमलेश चुटे, नितेश दोनोडे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
पोलीस निरीक्षकावर नागरिकांचा रोष
By admin | Updated: August 27, 2016 00:13 IST