हड्डीटोली चौकीवर पूल बांधकाम सुरू करा
गोंदिया : शहरातील हड्डीटोली येथील रेल्वे चौकीवर रेल्वे गाड्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असल्याने नागरिकांनी चौकावर ताटकळत उभे राहावे लागते. येथे उड्डाणपूल तयार झाल्यास नागरिकांचा वेळ वाया जाणार नाही. आता पुलाला मंजुरी आली आहे. मात्र, लवकर काम करण्याची मागणी आहे.
कॉलनीत नाली बांधकामाची मागणी
गोंदिया : शहरातील विवेकानंद कॉलनीत नाल्यांचे बांधकाम नसल्याने कित्येकांच्या घरासमोर पावसाचे पाणी साचून राहते. अशात कित्येकदा चिखलात घसरून नागरिक घसरून पडले आहेत. नगरपरिषदेने घरासमोर नाली बांधकाम केल्यास पावसाचे पाणी त्यातून निघून जाणार. त्यासाठी नाली बांधकामाची मागणी केली जात आहे.
उखडलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
गोंदिया : मामा चौक ते डॉ.गुजर यांच्या घरापर्यंतचा रस्ता मोठ्या प्रमाणात उखडला आहे. या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे, पण त्यानंतर रद्द करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. मात्र, रस्ता उखडला असल्याने नागरिकांची चांगलीच फजिती होत आहे. रस्ता बांधकामाची मागणी केली जात आहे.
सिव्हिल लाइन्स परिसर अंधारात
गोंदिया : शहरातील सिव्हिल लाइन्स परिसरातील माता मंदिर चौक ते पुढे मामा चौकापर्यंत पथदिवे रात्रीला बंद असतात. यामुळे हा परिसर रात्रीला अंधारात असतो. या परिसरातील रस्ते अगोदरच उखडलेले आहेत. त्यात अंधार असल्याने नागरिकांनी ये-जा करताना त्रास होतो. नगरपरिषदेने लक्ष देऊन पथदिवे सुरू करण्याची गरज आहे.
ब्रेकर ठरत आहेत धोकादायक
गोंदिया : शहरात आजघडीला मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर ब्रेकर तयार करण्यात आले आहेत. या ब्रेकरमुळे नागरिकांना वाहनांची गती कमी लागते हे खरे. मात्र, ब्रेकरच्या झटक्यांमुळे कित्येकदा अपघातही घडत आहेत. कित्येकदा दुचाकीवर मागे बसलेली व्यक्ती खाली पडल्याचे प्रकार घडले आहेत. अव्यवस्थितरीत्या तयार करण्यात आलेले ब्रेकर काढण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे
गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) ग्रामीण भागामध्ये १ लाख किलोमीटर लांबीचे पादंण रस्ते व इतर खडीकरण रस्ते निर्मितीचा संकल्प करण्यात आला आहे.
जंगलातील वनसंपदा तोडण्याचा सपाटा सुरू
पांढरी : वनसंपदेने नटलेल्या जिल्ह्यातील वनांमध्ये वनतस्कर व शिकाऱ्यांची वहिवाट दिसून येते. तस्करांनी वनविभागाचे दुर्लक्ष साधून वनसंपदा तोडण्याचा सपाटा सुरू केल्याचे दिसत आहे.
विश्रामगृह तयार करण्याची मागणी
केशोरी : जिल्ह्यास्थळावरून या भागाची पाहणी करण्यासाठी किंवा शासकीय कामासाठी येणारे वरिष्ठ अधिकारी आमदार, खासदार येथे येतात. त्यांना थांबण्यासाठी येथे विश्रामगृहाची आवश्यकता आहे.
सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक
तिरोडा : तालुक्यातील अनेक ठिकाणी वीज कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. वीजपुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे त्यापासून केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.