गोंदिया : तिरोडा तालुक्याच्या लोणारा येथील एका निर्दयी बापाने दोन वर्षांच्या चिमुलकीला जमिनीवर आपटून ठार केल्याची घटना २ फेब्रुवारीच्या सायंकाळी ७ वाजता घडली. २० महिन्यांची चिमुकली रडत असल्याने तिला खाऊ घेण्यासाठी पतीला पत्नीने ५ रुपयांची मागणी केली; परंतु तिला पाच रुपये न देता मुलीला दारावर आपटून निर्दयी बापाने तिचा जीव घेतला. वैष्णवी विवेक उईके (२० महिने), असे मृत मुलीचे नाव आहे.
तिराेडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या लोणारा येथील विवेक विश्वनाथ उईके (२८), रा. लोणारा, असे आरोपी बापाचे नाव आहे. यासंदर्भात वैष्णवीची आई वर्षा उईके (२२) यांनी तिराडा पोलिसांत तक्रार केली. आरोपी विवेक विश्वनाथ उईके (२८) याच्यासोबत सन २०१८ लाख लग्न झाले. त्या दोघांना वैष्णवी ही पहिलीच मुलगी झाली. विवेक नेहमीच दारू पिऊन पत्नीला मारहाण करायचा. तरीही ती लग्नानंतर पतीसोबत एकत्र राहिली. नंतर भांडणामुळे मुलीला घेऊन ती माहेरी खडकी पालोरा, ता. मोहाडी, जि. भंडारा येथे राहत होती. त्यानंतर विवेकने एक दिवस साला राकेश धनश्याम कंगाले (१९) याला माझ्या पत्नी व मुलीला आणून दे म्हटल्यावर डिसेंबर २०२० मध्ये वर्षा मुलीला घेऊन पतीकडे आली. २ फेब्रुवारी रोजी आरोपी विवेक सकाळी ८ वाजता कोडेलोहारा येथे लग्नाला गेला होता. लग्न आटोपून सायंकाळी ७ वाजता आला असताना मुलीसाठी खाऊ घेण्यासाठी वर्षाने पतीला ५ रुपये मागितले. मुलगी रडत असल्याने तिची समज काढण्यासाठी तिला खाऊ देईन, अशी वर्षाची समज होती; परंतु रडणाऱ्या वैष्णवीला आरोपी विवेकने पत्नीजवळून हिसकावून दारावर आपटले. यात तिचा मृत्यू झाला. पतीला थांबविण्याचा प्रयत्न केला असता तिलाही धक्का देऊन पाडले. मुलीला जेव्हा आपटले तेव्हा तिने संडास केली होती. बेशुद्धावस्थेत पडलेल्या मुलीला वर्षा दवाखान्यात घेऊन जात असताना पतीने पुन्हा तिला दोन थापडा मारल्या व मुलीला घेऊन तो दवाखान्यात घेऊन गेला. मात्र, ती मृत पावल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे तिला परत घरी आणण्यात आले. या घटनेसंदर्भात तिरोडा पोलिसांनी भा.दं.वि.च्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.