गोंदिया : मुलगा-मुलगी अल्पवयीन असतानाही त्यांचा विवाह लावण्याचा प्रकार उघडकीस आला असून, भरोसा व दामिनी पथकाच्या सजगतेने हा बालविवाह थांबविण्यात आला. आमगाव तालुक्यातील ग्राम मोहरानटोली येथील शुक्रवारी (दि. ७) हा प्रकार घडला आहे.
आमगाव तालुक्यातील ग्राम मोहरानटोली येथे शुक्रवारी (दि. ७) बालविवाह लावला जात असल्याची माहिती दामिनी पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे दामिनी व भरोसा पथकाचे अंमलदार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाळे व त्यांचे सहकारी नियोजित विवाहस्थळी पोहोचले. तेथे लग्न समारंभाची तयारी सुरू होती व मंडप टाकलेले होते. यावर पथकाने नियोजित वर वधू यांची चौकशी केली असता मुलाचे वय १७ (रा. आमगाव) व मुलीचे वय १७ (रा. आमगाव) असल्याचे कळले. यावर दामिनी पथक व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गोबाडे यांनी मुला-मुलीच्या पालकांना बालविवाह कायद्याबाबत माहिती देऊन समज दिली. तेव्हा मुला-मुलीच्या पालकांनी नियोजित विवाह रद्द करीत असल्याचे मान्य केले. त्यानंतर मुला-मुलीसह त्यांच्या पालकांना सीडब्लूसी समिती समोर हजर करण्यात आले.
यांचा कामगिरीत होता सहभाग
ही कामगिरी पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशान्वये प्रभारी पोलिस उपअधीक्षक (गृह) नंदिनी चानपूरकर यांच्या मार्गदर्शनात भरोसा सेलच्या पोलिस निरीक्षक मनीषा निकम, दामिनी पथकातील शिपाई राजेंद्र अंबादे, पूनम मंजुटे, वैशाली भांदक्कर, प्रीती बुरेले, राधेश्याम रहांगडाले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गोबाळे, रवींद्र टेंभुर्णे, मनीषा चौधरी, भागवत सूर्यवंशी, अशोक बेलेकर, अमित बेलेकर, ज्ञानेश्वर पटले, दीपमाला भालेराव यांनी केली.