नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मिनी मुंबई म्हणून ओळखला जाणारा गोंदिया जिल्हा आता 'उडता पंजाब'च्या वाटेवर जात असल्याचे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी मोहिमेत केलेल्या कारवायांवरून दिसून येत आहे. मागील दीड वर्षात पोलिसांनी अमली पदार्थाविरुद्धच्या कारवार्यात तब्बल १६१ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यात १२१ जणांवर तर चक्क अमली पदार्थाचे सेवन केल्यावरून कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे अनेकजण अवैध मार्गाकडे वळत आहेत. जिल्ह्यात दारूबंदीच्या काळापासून तर गांजा, ब्राऊन शुगर, एमडी ड्रग्जच्या तस्करीत अनेकांनी शिरकाव केला. गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यातील विविध भागांतून पोलिस विभागाने मोठ्या प्रमाणात गांजा, एमडी जप्त केला आहे. अवैध ड्रग्ज, गांजा तस्करीचे हे जाळे केवळ शहरी भागापुरते मर्यादित नसून ग्रामीण भागातही पोहोचल्याचे पोलिसांच्या कारवायांवरून दिसून येत आहे. त्यामुळे एकेकाळी जंगलसंपत्ती आणि तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असलेला गोंदिया जिल्हा गांजाच्या धुरात हरवत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
तरुणाईला गांजाची झिंगदारू, कोकेन, चरस, एमडी ड्रग्जच्या तुलनेत गांजा स्वस्त आहे व तो सहज उपलब्ध होतो. खिशात पुडी घेऊनही फिरता येते. गांजाचा नशा दीर्घकाळ टिकून राहते. यामुळे गांजाचा वापर वाढल्याचे दिसत आहे. महाविद्यालयीन तरुण आणि मजुरांकडून याचा वापर वाढल्याने मागणी वाढली आहे. काही तरुणीदेखील गांजाच्या आहारी गेल्याचे दिसत आहे.
शहरातील निर्जन ठिकाणी नशेबाजांची टोळकीशहरातील बहुतांश मैदाने, सूनसान परिसर नशेबाजांचे अड्डे बनले आहेत. नशेबाजांमुळे नागरिकांना बाहेर फिरणे मुश्कील बनले आहे. कोणी हटकले तर ते थेट अंगावर धावून जातात. त्यामुळे यांना कुणी हटकतानाही दिसत नाही.
गुन्हेगारीत वाढगेल्या वर्षभरातील झालेल्या गंभीर गुन्ह्यांमधील बहुतांश आरोपी गांजाच्या नशेत होते. गोंदियात झालेल्या हत्येच्या प्रकरणातील आरोपीही गांजाचे सेवन करून असल्याचे समोर आले आहे.
"जिल्ह्यात अमली पदार्थविरुद्ध विशेष मोहीम राबवून मागील १७ महिन्यांत १६१ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. कारवाईची मोहीम सुरूच आहे. जिल्ह्यात कुठेही अशाप्रकारचे अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणारे, सेवन करणारे किंवा वाहतूक करीत असल्याचे आढळून आल्यास तत्काळ जवळील पोलिस ठाण्यात किंवा पोलिस नियंत्रण कक्ष वा डायल ११२ वर माहिती देऊन जिल्हा नशामुक्त करण्यास सहकार्य करावे."- गोरख भामरे, पोलिस अधीक्षक, गोंदिया.