गोंदिया : दिवाळीचा सण म्हटला की नातेवाईक व आप्तेष्टांच्या भेटीगाठी आणि घरी पाहुण्यांची वर्दळ असते. किंवा अनेक जण बाहेरगावी जाण्याचे बेत आखतात. अशात अडथळा येतो तो सुट्यांचा. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांची दिवाळी तर कामातच जाते. यंदा मात्र शासकीय सेवेत असलेल्यांसाठी यावेळची दिवाळी आनंददायी ठरली आहे. सलग चार दिवसांच्या सुट्यांमुळे सरकारी कार्यालये ओस पडली असली तरी कर्मचारी मात्र सुट्या एन्जॉय करीत आहेत.दिवाळीनंतर सलग तीन दिवसांच्या सुट्या आल्याने सरकारी कर्मचारी दिवाळीच्या सुट्यांत मनमुराद मौजमस्ती करून दिवाळी साजरी करीत आहेत. २१ आॅक्टोबर रोजी धनत्रयोदशीपासूनच दिवाळीला सुरूवात झाली. २२ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांची सुट्टी जाहीर केली होती. तर २३ आॅक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन झाले आणि सुट्यांचा वर्षावच सुरू झाला आहे. राज्य शासनाने २३ आणि २४ तारखेची सुटी जाहीर केलीच होती. २५ तारखेला चवथा शनिवार तर २६ तारखेला रविवारच असल्याने सुट्याच सुट्या यंदा नोकरदारांना मिळाल्या आहेत. हिंदूधर्मीयांचा सर्वात मोठा सण म्हणून दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भाऊबीाजेच्या दिवशी बहिणी अगत्याने भावाला ओवाळायला येतात, तर नोकरी व कामाच्या निमित्ताने बाहेरगावी राहणारेही आपल्या परिवारासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी घरची वाट धरतात. दिवाळीच्यानिमित्ताने अवघा परिवार एकत्र येतो. शाळांनाही सुट्या राहात असल्याने बाहेरगावी फिरण्याचा बेतही आखला जातो. सुट्यांच्या कमतरतेमुळे हे सर्व कार्यक्रम बहुतांश फिसकटतात. त्यातही खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना मात्र लक्ष्मीपूजनाच्या एकाच दिवसावर निभावून घेत दुसऱ्या दिवशी आपल्या कामावर जावे लागले. मात्र यंदाची दिवाळी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बंम्पर ठरली आहे. सलग सुट्यांमुळे ते ही दिवाळी आपल्या परिवारासोबत घालवून चांगलाच एन्जॉय करीत असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)
नोकरदार वर्गाची बम्पर दिवाळी
By admin | Updated: October 25, 2014 22:41 IST