गोंदिया : रायफल साफ करीत असताना बंदुकीतून चुकीने गोळी सुटल्याने राज्य राखीव दलाचा जवान जखमी झाला. दर्रेकस सशस्त्र दूर क्षेत्र (एओपी) येथे रविवारी सकाळी ९ वाजतादरम्यान ही घटना घडली. जखमी जवानाच्या हाताच्या अंगठ्याला गोळी लागली असून त्याला येथील खासगी रूग्णालयात उपचारार्थ भर्ती करण्यात आले आहे. राज्य राखीव पोलीस बलाच्या पथकाची तीन महिन्यांसाठी कॅम्प प्रोटेक्शन ड्युटी लावली जाते. त्यानुसार गट क्रमांक १० मधील जवान सिंधराम महालप्पा गंभीरे (४४, रा. सोलापूर) हे सध्या दर्रेकसा एओपीमध्ये ड्युटीवर आले आहेत. आज सकाळी ते आपल्याकडील रायफल साफ करीत असताना अचानक चुकीने त्यांच्या बंदुकीतून गोळी सुटली. ही गोळी त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला लागली. यामुळे मात्र पोलीस विभागात एकच खळबळ माजली आहे. जखमी गंभीरे यांना त्वरीत येथील बी.जे. हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ भर्ती करण्यात आले. मात्र त्यांच्या अंगठ्यालाच गोळी लागल्याने त्यांना फार काही गंभीर जखमी झाली नाही. यामुळे त्यांच्या बोटावर लगेच उपचार करण्यात आले. याबाबत पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांना संपर्क केला असता त्यांनी चुकीने हा प्रकार घडला असून जवानाची प्रकृती बरी असल्याचे सांगत वृत्ताला दुजोरा दिला. (शहर प्रतिनिधी)
बंदुकीतून गोळी सुटली, जवान जखमी
By admin | Updated: May 11, 2014 23:48 IST