मालमत्ता कर मूल्यांकनावर भर : आर्थिक स्रोत वाढविले जाणार गोंदिया : गोंदिया नगर पालिकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता १२४ कोटी ८१ लाख ९४ हजार ८६० रूपयांचा प्रारूप अर्थसंकल्प गुरूवारी (दि.१६) आयोजित विशेष सभेत सादर केला. नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी सादर केलेल्या या प्रारूप अर्थसंकल्पात मालमत्ता कर मूल्यांकनावर भर देत आर्थिक स्रोत वाढविण्याचा निर्णय घेतला. शिवाय स्वच्छता, वीज, पाणी पुरवठा व रस्ते बांधकामांवरील खर्च वाढविण्यात आला आहे. आर्थिक वर्ष सन २०१७-१८ च्या प्रारूप अर्थसंकल्पासाठी पालिकेत गुरूवारी (दि.१६) विशेष सभा घेण्यात आली. यात वर्ष २०१६-१७ मधील एकूण उत्पन्न १२० कोटी ५८ लाख तीन हजार ७६७ रूपये व १०८ कोटी नऊ लाख सात हजार ८६२ रूपयांचा अनुमानीत खर्च सादर करण्यात आला. यानंतर वर्ष २०१७-१८ करिता १२४ कोटी ८१ लाख ९४ हजार ८६० रूपयांचा प्रारूप अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात १११ कोटी ३५ लाख २४ हजार २०८ रूपयांचा अनुमानीत खर्च नगराध्यक्षांनी सादर केला. विशेष म्हणजे या प्रारूप अर्थसंकल्पात शहरातील स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा, वीज पुरवठा व रस्ता बांधकामावर विशेष लक्ष देण्यात आले असून त्यासाठी जास्त निधीची तरतूद करण्यात आली. (शहर प्रतिनिधी) हे आहेत प्रमुख खर्च पालिकेला येत असलेल्या प्रमुख खर्चांत कर्मचाऱ्ऱ्यांचे पगार व आकस्मिक खर्च १३ कोटी ४४ लाख नऊ हजार ८९० रूपये, कर ८० लाख ४५ हजार रूपये, अग्निशमन विभाग ९४ लाख ३० हजार ४१० रूपये, वीज दोन कोटी ३३ लाख ९१ हजार ६०० रूपये, पाणी पुरवठा दोन कोटी ४७ लाख २४ हजार ६३० रूपये, आरोग्य सात कोटी ८० लाख ६३ हजार रूपये, बांधकाम पाच कोटी २६ लाख ३८ हजार ७४० रूपये, शिक्षण विभाग १३ कोटी २१ लाख १४ हजार ७०० रूपये यासह अन्य विविध खर्चांसाठी ६७ कोटी २५ लाख ७४ हजार ९६१ रूपयांचा अंदाजित खर्च आहे. असे आहे अनुमानित उत्पन्न पालिकेला मालमत्ता कराच्या रूपात येत्या आर्थिक वर्षात सात कोटी ७५ लाख ६४ हजार ३५५ रूपये व अतिरिक्त उत्पन्नाच्या स्वरूपात सहा कोटी ८५ लाख रूपये, शासनाकडून शासकीय अनुदानातून ५९ कोटी ३५ लाख रूपये, आर्थिक व्यवहारातून ४७ कोटी २१ लाख रूपये, सामान्य उत्पन्नातून तीन कोटी ६३ लाख रूपये अशाप्रकारे १२४ कोटी ८१ लाख ८६० रूपये अनुमानित उत्पन्न आहे. वीज, बांधकाम व स्वच्छतेवर खर्च वाढणार पालिकेच्या या प्रारूप अर्थसंकल्पात शहरातील स्वच्छता, रस्ते, वीज, पाणी व बांधकामावर अगोदरच खर्च वाढवून घेण्यात आला होता. मात्र यातील स्वच्छता, वीज व बांधकाम विभागातील खर्च आणखी वाढविण्यात यावा अशा सूचना प्राप्त झाल्या. त्यामुळे आता या विभागांवरील खर्च आणखी वाढविला जाणार असून त्यानंतर हा अर्थसंकल्प जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जाणार आहे. विशेष म्हणजे पालिके कडून कॉन्व्हेंट स्कूलची स्थापना, शाळा इमारतीची दुरूस्ती, नवीन कत्तल खान्याची निर्मिती सिटी बस सेवा, व्यायामशाळा व वाचनालयाची निर्मिती तसेच कुंभारेनगरात दवाखान्याची स्थापना करण्यावर लक्ष दिले जात आहे.
१२४.८१ कोटींचा अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2017 01:44 IST