सुकडी-डाकराम : नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल व जंगलव्याप्त क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्षेत्रातील रस्त्याचे काम ३ वर्षांपासून अर्धवट असल्याने रस्त्यावर अनेक अपघात घडले आहेत. मात्र, तरीही या रस्त्याकडे प्रशासन व राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष आहे, असा आरोप परिसरातील जनता करीत आहे.
तिरोडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत बोदलकसा ते बिर्सी फाटा या मुख्य रस्त्याचे खडीकरण, रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम ३ वर्षांपासून सुरू आहे; पण हा ९-१० किमी. अंतराचा रस्ता अजूनपर्यंत अर्धवट आहे. मागील वर्षी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम बोदलकसा, पिंडकेपार, सुकडी-डाकरामपर्यंत झाले. मात्र, रावणघाटा, मेंढा व बिर्सी फाटापर्यंत रस्ता उखडलेला असून या रस्त्यावर आतापर्यंत जवळजवळ १०० अपघात झाले आहेत. यात कुणाच्या हात, पाय, कंबर व डोक्याला मार लागला तर कुणी मृत्युमुखी पडले आहे. या रस्त्याकडे शासन व राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष आहे. रस्ता मुख्य जिल्हा मार्ग असल्याने गोंदिया, देवरी, डोंगरगढ, रायपूर, भिलाई, बालाघाट, मध्यप्रदेश व छत्तीसगडला जाणारी जड वाहतूक याच मार्गाने होते. रहदारी जास्त असल्यामुळे संपूर्ण रस्ता उखडलेला आहे. ३ वर्षांपासून अर्धवट राहिलेले डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित सुरू करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा परिसरातील जनतेने दिला आहे.