अर्जुनी मोरगाव : स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत कार्यरत कृषी सहायकांनी प्रलंबित असलेल्या १२ मागण्यांची पूर्तता होण्यासाठी काळ्या फिती लावून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना तालुका शाखेच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी यांना शिष्टमंडळाद्वारे भेटून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कृषी सहायक संवर्गाच्या विविध मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी संघटनेच्या वतीने सहा टप्यात लढा दिला जाणार आहे. लढ्याच्या पहिल्या टप्यात तालुक्यातील कृषी सहायकांनी काळ्या फिती लावून काम करायला मंगळवारपासून (दि.९) सुरुवात केली. १५ फेब्रुवारीपासून लेखणीबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला जाणार आहे. जलयुक्त शिवार व मग्रारोहयोवर बेमुदत बहिष्कार घालण्यात येणार आहे. संघटनेच्या आंदोलनाची दखल घेवून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर तोडगा निकाला नाही तर सहाव्या टप्यात ७ मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा पवित्रा कृषी सहायकांच्या संघटनेने अंगिकारला आहे. कृषी सहायकांना कृषी पर्यवेक्षक पदी सेवाज्येष्ठतेने पदोन्नती, तदर्थ पदोन्नती, १२ वर्षांच्या सेवेनंतर पहिली व २४ वर्षानंतर दुसरी कालबद्ध पदोन्नती, कृषी विभागात ई-टेंडरिंग पद्धत रद्द करावी, तांत्रिक वेतनश्री लागू करावी, पदनाम सहायक कृषी अधिकारी करण्यात यावे, निविष्ठा वितरण प्रणालीमध्ये धोरणात्मक बदल करण्यात यावे, यासह प्रलंबित मागण्या शासनास्तरावरुन मार्गी लावण्यात याव्या. यासाठी कृषी सहायकांच्या संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. तालुक्यातील कृषी सहायकांनी काळ्याफिती लावून आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू केला. आंदोलनाच्या पहिल्या टप्यात प्रलंबित असलेल्या मागण्यांची पूर्तता होण्यासाठी तालुका शाखेच्या वतीने येथील उपविभागीय कार्यालयात जाऊन प्रभारी उपविभागीय अधिकारी बांबोर्डे यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवेदन देण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचे शाखा अध्यक्ष रमेश भडके, उपाध्यक्ष एन.एन. बोरकर, सचिव पी.एम. सूर्यवंशी, अविनाश हुकरे, भारती येरणे, पात्रीकर, कवासे, आर.एच. मेश्राम, मोहतुरे, ठवकर, एफ.एम. कापगते, आर.एन. रहांगडाले, येळणे, नखाते, मसराम यासह सर्व कृषी सहायक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
काळ्या फिती लावून कृषी सहायकांचे आंदोलन सुरू
By admin | Updated: February 11, 2016 02:15 IST