सालेकसा : तालुका भाजपा मंडळाच्या वतीने तालुकास्तरीय वर्षपूर्ती कार्यक्रम भातगिरणी सालेकसा येथील सभागृहात घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सदर कार्यक्रम घेण्यात आले. अध्यक्षस्थानी भाजपचे जेष्ठ नेते राकेश शर्मा होते. मार्गदर्शक म्हणून आमगाव क्षेत्राचे आ. संजय पुराम, जि.प. समाजकल्याण सभापती देवराज वडगाये, तालुका भाजप अध्यक्ष खेमराज लिल्हारे, पं.स. सदस्य प्रतिभा परिहार, प्रमिला दसरिया, जया डोये, किसान आघाडीचे अध्यक्ष इसराम बहेकार, संगीता शहारे व इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. त्या संबोधित करताना आ. संजय पुराम यांनी शासनाच्या विविध लोककल्याणकारी कार्यक्रमांची तसेच विकासाच्या दृष्टीने उचलण्यात आलेल्या पावलांबद्दल माहिती दिली. जेष्ठ नेते राकेश शर्मा यांनी शासनाच्या कामांना जनसामान्य लोकापर्यंत पोहोचवून पक्षाला मजबूत करण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमानिमित्त आलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली. आ. संजय पुराम यांनी याबद्दल कृषी मंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र बडोले यांनी केले. आभार जैतवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी परसराम फुंडे व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने तालुक्यातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
भाजपाचा वर्षपूर्ती कार्यक्रम
By admin | Updated: November 4, 2015 02:12 IST