गोंदिया : आता भाजीपाल्यांची राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आवक होत असतानाच गोंदियाच्या बाजारात बंगालच्या बटाट्याने एंट्री मारली आहे. हे बबाटे सध्या येथे चांगलीच धुम करीत आहे. कानपुरी बटाट्यापेक्षा स्वस्त व जास्त स्वादीष्ट असलेले हे बटाटे शहरवासीयांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. गोंदियात कानपुरी बटाटा जास्त प्रमाणात येतो. त्यामुळे रंगाने गडद पिवळसर असलेला हा बटाटा आपल्याकडे दिसत नाही. मात्र सुमारे १० वर्षांच्या दीर्घ कालावधी नंतर बंगालच्या बटाट्याने पुन्हा बाजारात एंट्री मारली आहे. त्याचे कारण असे की, आपल्याकडे बहुतांश शिवराजपूर (कानपूर) येथील बटाटा मागविला जातो. मात्र कानपुरी बटाट्याचे भाव मध्यंतरी वधारले होते व त्यासाठी वाहतूकीचा खर्च सुद्धा जास्त येत असल्याने त्या तुलनेत खडकपुरचा (बंगाल) बटाटा येथील दलालांना परवडत होता. त्यामुळे येथील दलालांनी बंगलाचा बटाटा मागविण्यास सुरूवात केली. याबद्दल येथील दलाल जगदीश जीवंजा व सुमीत उजवने यांच्याकडून जाणून घेतले असता त्यांनी सांगीतले की, मागील १० वर्षांपूर्वी बंगालचा बटाटा बाजारात येत होता. मात्र गडद पिवळसर रंग असल्याने पांढरट असलेल्या कानपुरी बटाट्याकडे लोकं जास्त आकर्षीत होत होते व त्याची मागणी जास्त होती. यामुळे हळूहळू बंगालचा बटाटा बाजारात येणे बंद झाले. मात्र सध्या कानपुरी बटाट्याचे भाव वधारले असून त्यासाठी वाहतूकीचा खर्चही जास्त पडत असल्याने बंगालचा बटाटा पुन्हा मागविला जाऊ लागला आहे. तेथील मातीचा रंग पवळसर असल्यामुळे बंगालचे बटाटे जास्त गडद रंगाचे असतात शिवाय सुरक्षीत ठेवण्यासाठी व चमकण्यासाठी त्यावर पावडर लावले जाते. छत्तीसगड, उडीसा व तेथून पुढे सर्वत्र बंगालचा बटाटा बाराही महिने वापरला जात असून कानपुरी बटाट्यापेक्षा बंगालचा बटाटा जास्त स्वादीष्ट असल्याचेही हे दलाल सांगतात. आजघडीला बाजारात कानपुरचा बटाटा २६ प्रतिकिलो दराने तर बंगालचा बटाटा २४ दराने विकला जात आहे. त्यामुळे या नव्या बटाट्याची चांगलीच मागणी असल्याचेही दलाल सांगतात. (शहर प्रतिनिधी)
गोंदियाच्या बाजारात बंगालच्या बटाट्यांची एंट्री
By admin | Updated: August 3, 2014 00:10 IST