सालेकसा : येथील एकमेव राष्ट्रीयीकृत बँक असलेली बँक ऑफ महाराष्ट्र येथील सहायक व्यवस्थापकाला कोरोनाची लागण झाल्याने एकीकडे बँकेचे कर्मचारी आणि नेहमी येणाऱ्या ग्राहकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले तर दुसरीकडे बँक बंद झाल्याने तालुक्यातील हजारो ग्राहकांना याचा फटका बसला.
सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस व सालेकसाचा आठवडी बाजाराचा दिवस होता. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रासमोर ग्राहकांची सकाळी १० वाजतापासून गर्दी होऊ लागली. परंतु ११ वाजतानंतर सुद्धा जेव्हा बँक उघडण्यात आली नाही तेव्हा ग्राहक त्रस्त झाले व विचारपूस करु लागले. तेव्हा बँकेत रुजू झालेले सहायक व्यवस्थापक यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यामुळे बँक बंद ठेवण्यात आली असल्याचे कळाले. कर्मचाऱ्याच्या संपर्कात इतर कर्मचारी आणि अनेक ग्राहक सुद्धा संपर्कात आले आहेत. त्यामुळे याचे संक्रमण इतरांना सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच बँकेला सॅनिटाईझ करुनच पुन्हा सुरु केले जाईल. परंतु अद्याप बँक केव्हा सुरु होईल याबद्दल स्पष्ट झाले नाही.