कर्मचाऱ्यांत नाराजी : नागरिकांची कामे खोळंबणारगोंदिया : ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’ असला प्रकार नगर परिषदेत सुरू असतानाच आता पालिका कर्मचाऱ्यांची ‘बीएलओ’साठी ड्यूटी लावण्यात आली आहे. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांना रविवारची सुट्टी मुकावी लागणार असून त्यानंतर घरोघरी सर्वेक्षण करावे लागणार असल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांत मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे. अगोदरच पालिकेच्या पाच कर्मचाऱ्यांची नगर पंचायतसाठी ड्यूटी लावण्यात आली आहे. आठवड्यातून दोन दिवस त्यांना आपापल्या नगर पंचायतमध्ये जावून कामे करावी लागत आहेत. यापासून पालिकेचे प्रशासनीक अधिकारीही सुटले नाहीत. हे पाच कर्मचारी नगर पंचायतला गेल्यावर त्यांची नगर पालिकेतील कामे खोळंबून पडतात. परिणामी नागरिकांना आल्या पावली परतून जावे लागते. त्यात आता नगरपंचायतच्या निवडणुका लागल्या असून आणखीही काही कर्मचाऱ्यांची तेथे ड्यूटी लावली जाणार असल्याची माहिती आहे. हे तर झाले, मात्र आता पालिकेतील कर्मचाऱ्यांची ‘बीएलओ’साठी (बूथ लेवल आॅफीसर) ड्यूटी लावण्यात आली आहे. यांतर्गत या कर्मचाऱ्यांना ११ व १८ तारखेच्या दोन्ही रविवारच्या सुट्टीच्या दिवशी ठरवून दिलेल्या बूथवर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता पर्यंत ड्यूटी करायची आहे. तर त्यानंतर त्यांना घरोघरी जावून सर्वेक्षण करावे लागणार असल्याची माहिती आहे. एकतर सुट्टीच्या दिवशी काम करावे लागणार आहे. शिवाय पालिकेचे काम करून सर्वेक्षणही करावे लागणार असल्याने या कर्मचाऱ्यांत चांगलाच रोष व्याप्त आहे. (शहर प्रतिनिधी)सुमारे ७० कर्मचाऱ्यांचा समावेश ‘बीएलओ’ ड्यूटीसाठी पालिकेतील सुमारे ७० कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. आपल्या सु्ट्टीच्या दिवशीही या सर्वांना काम करावे लागणार असल्याने या सर्वांत नाराजी दिसून येत आहे. विशेष म्हणजे आता सणांचा काळ असून त्यातच आता हे काम आल्याने अधीकच नाराजी आहे. पीएमटी परिक्षेतही लावले कामाला रविवारी (दि.११) भारतीय लोक सेवा आयोगाची परिक्षा घेण्यात आली. या परिक्षेतही पालिकेतील काही कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात आले होते. एकतर बीएलओचे काम दिले जात असून सोबतच परिक्षांमध्येही बोलाविले जात आहे. सुट्टीचा दिवस असाच जात असल्याने कर्मचारी संतापले आहेत. मात्र उपाय नसल्याने मन मारून त्यांना आपली ड्यूटी बजवावी लागत आहे.
पालिका कर्मचाऱ्यांची लागली ‘बीएलओ’ ड्यूटी
By admin | Updated: October 12, 2015 02:03 IST