गोंदिया : महाराष्ट्र शासनाने सन २००७ वर्षापासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम हाती घेतली. गावात शांतता राहावी, वादविवाद होणार नाहीत. गावातील कोणतेही वाद न्यायापर्यंत पोहोचणार नाही याची दखल घेऊन गावात समित्या स्थापन केल्या. आता मात्र त्या समित्यांची आगेकूच थांबली असल्याचे चित्र दृष्टीस पडत आहे. या योजनेची उद्दिष्ट्ये सफल करण्यासाठी अनेक गावे या मोहिमेंतर्गत तंटामुक्त झालीत. वर्षानुवर्षे न्यायालयात धुळखात पडलेली प्रकरणे निकाली लागली व गावात चैतन्य निर्माण झाले. या नऊ वर्षाच्या काळात आमूलाग्र बदल घडून आला. मागील चार वर्षातच तंटामुक्त अभियानाच्या बाबतीत गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशावर चमकू लागला. तंटामुक्त गाव घोषीत करण्यासाठी शासनाने काही अटी व नियम ठेवले होते. त्यामध्ये दारुबंदी, सामूहीक विवाह सोहळा करणे, सर्वधर्म समभाव, धार्मिक सलोखा निर्माण करणारे उपक्रम, महिला सक्षमीकरण, पुतळ्यांची देखरेख व त्यांच्या जयंती उत्सव व पुण्यतिथी, आंतरजातीय विवाह आदी अनेक उपक्रमाचा अंतर्भाव यामध्ये करण्यात आला. पुरस्काराच्या हेतूने काही तंटामुक्त समित्यांनी गावामध्ये विविध उपक्रम राबविले. गावात दारुबंदी व व्यसनमुक्ती करून अनेकांचे उद्ध्वस्त संसार पुन्हा थाटले. पती-पत्नी मधील वाद मिटवून त्यांच्या प्रकरणाला मार्गी लावून त्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण केले. याशिवाय अनेक चांगले उपक्रम राबवून गावाला नंदनवन करणे, याद्वारे गावाला लाखो रुपयाचे बक्षीस मिळाले परंतु आजही अनेक गावाचे हाल जैसे थे असे झाले आहे. अभियानापुर्वी वाहणारा दारुचा महापूर पुन्हा सुरु झाला. आता तर पुरस्कारप्राप्त गावातील तंटामुक्त समितीचे पदाधिकारीच व्यसनाधिन झाल्याचे चित्र दिसत आहेत. एकंदरीत समित्या उद्दिष्टाच्या पलिकडे घसरायला सुरुवात झाली आहे. काही गावात मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेचे विनियोग करण्यात बऱ्याच आल्या आहेत. या मोहीमेतील वास्तव म्हणजे अनेक गावात केवळ कागदोपत्रीच अनेक उपक्रम राबविण्यात आले. दारुचा महापुर सुरु असताना कागदोपत्रीच दारु मुक्तता झाली. प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आणि रेकॉर्ड वेगळा अशी आगळीवेगळी परिस्थिती असतानासुद्धा गावे तंटामुक्त झाली हे केवळ कशासाठी तर पुरस्कारासाठी काही का असेना परंतु काही गावात शांतता निर्माण झाली. गावे दारुमुक्त झाले व आदर्शतेची वाटचाल सुरु झाली. पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन गाव तंटामुक्त केले मिळालेल्या पुरस्काराकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. पण त्या समित्याची आगेकुच थांबली असल्याचे दिसत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
पुरस्कारप्राप्त तंटामुक्त समित्या झाल्या उदासीन
By admin | Updated: May 7, 2015 00:32 IST