गोरेगाव : वीटभट्टी कामगार व मालकांना शासनाच्या अनेक जाचक अटींमुळे आतापर्यंत सुविधा मिळत नव्हत्या. गावातच कामगाराला काम मिळवून देणाऱ्या विटाभट्टी मालकांना व मजुरांना उद्योगीय सुविधा मिळाव्या आणि वीटभट्टीला लघुउद्योगाचा दर्जा मिळावा म्हणून आपण उद्योगमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवून प्रयत्न करू, असे आश्वासन पालकमंत्री व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.तालुक्यातील डव्वा येथे जिल्हा वीटभट्टी कंत्राटदार संघटनेच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर व नवनिर्वाचित आमदार व पालकमंत्र्यांच्या सत्कार समारंभात ते शुक्रवारी बोलत होते. जि.प. शाळा डव्वाच्या पटांगणावर झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ.खुशाल बोपचे होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, कृषी सभापती मोरेश्वर कटरे, माजी आ.हेमंत पटले, पं.स. सभापती चित्रकला चौधरी, संतोष चव्हाण, भरत क्षत्रीय, भीटभट्टी असोसिएशनचे अध्यक्ष मुस्तफा सिद्दिकी, सरपंच जगदीश कोल्हे, उपसरपंच दिनेश शहारे, तंमुस अध्यक्ष लोकेश बिसेन, आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्या आला. यावेळी आ.विजय रहांगडाले म्हणाले, दरवर्षी शासनाच्या व खासगी इमारतींसाठी गावातूनच विटांचा पुरवठा केला जातो. आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी जाचक अटी लावून या उद्योगाची गळचेपी केली. यापुर्वी सुद्धा आपण वीटभट्टी कामगाव व कंत्राटदारांच्या पाठीशी होतो व आताही आम्ही आपल्या पाठिशी आहोत, असे सांगितले.पर्यावरणाच्या अटीमुळे विट भट्टी चालकांना अनेक समस्यांना तोड द्यावे लागते. आमच्या जिल्ह्यात राईस मिलमुळे प्रवाशांना व गाडी चालकांना होत असलेल्या त्रासाबद्दल कुणीच काही बोलत नाही. विटभट्टी कामगारांचा विमा उतरवणे आवश्यक केल्याने होत असलेल्या त्रासाबद्दल कुणीच काही बोलत नाही. संघटनेने याकडे लक्ष पुरवावे असे मत हेमंत पटले यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. बोपचे यांनी संघटनेच्या मागण्या रास्त असून वीटभट्टी कामगार व मालकांना न्याय मिळाला व जाचक अटी शिथील करण्यात याव्या तेव्हाच विट भट्टीचा मालक व कामगारांना अनेक सुविधा मिळू शकेल असे सांगितले. दरवर्षी आठ महिने चालणारा हा उद्योग असल्यामुळे याला लघुउद्योगाचा दर्जा मिळालाच पाहिजे, यासाठी आपणही प्रयत्न करुन असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे मोहन गौतम यांनी केले. संचालन अशोक हरिणखेडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश लालवानी, दिगंबर लिचडे, कमलेश सोनवाने, मुकेश हलमारे, गणेश तुरकर, गुड्डू कोल्हे, विजय चक्रवर्ती, मिठाईलाल चक्रमवर्ती, तुळशी चक्रवर्ती शाकिर खान, प्रभू चक्रवर्ती, किशोर धपाडे, राकेश कोल्हे, आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी विटभट्टी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले व शेकडो कामगारांची आरोग्य तपासणी करुन औषधी वितरीत करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
वीटभट्टीला लघुउद्योगाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न
By admin | Updated: February 22, 2015 01:35 IST