लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : रुग्णालय प्रशासनाने शासनाकडे रुग्णवाहिकांच्या डिझेलसाठी गेल्या तीन महिन्यांपासून निधीची मागणी करूनही शासनाने तो उपलब्ध न करून दिल्याने स्थानिक बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या तीन रुग्णवाहिका गेल्या महिनाभरापासून रुग्णालयाच्या आवारात उभ्या आहेत. येत्या आठ दहा दिवसांत निधी उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकांची ठप्प होण्याची शक्यता आहे.
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत गर्भवती, प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला व १ वर्षापर्यंतच्या बालकांना उपचारासाठी आणि उपचार झाल्यानंतर घरी सोडून देण्यासाठी शासकीय रुग्णालयाकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते. यासाठी शासनाकडून प्रति रुग्ण २५० रुपयांचे अनुदान दिले जाते. पण दिल्या जाणाऱ्या अनुदानाची रक्कम फारच कमी असून त्या तुलनेत खर्च अधिक येत असल्याने व यासाठी अनुदान वेळेवर मिळत नसल्याने रुग्णवाहिकांमध्ये डिझेल भरण्यासाठीसुद्धा पैसे नसल्याने या रुग्णवाहिका उभ्या ठेवण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली आहे. येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात जिल्ह्यातून व लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील गर्भवती प्रसूतीसाठी दाखल होतात. येथे बालकांवरसुद्धा उपचार केले जात असल्याने बालकांनासुद्धा येथे दाखल केले जाते.
जिल्ह्यातून प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलांना प्रसूतीनंतर रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने घरापर्यंत सोडून दिले जाते. यात देवरी, चिचगड, अर्जुनी मोरगाव इतर तालुक्यातील दूरवरच्या गर्भवतींचा समावेश असतो. पण सर्वांसाठी प्रति रुग्ण अनुदान २५० रुपयेच मिळत असल्याने एवढ्या कमी पैशात रुग्णांना रुग्णवाहिकेने त्यांच्या घरापर्यंत सोडायचे कसे असा प्रश्न आहे. बाई गंगाबाई महिला रुग्णालयाला गेल्या तीन महिन्यांपासून रुग्वाहिकेसाठी शासनाकडून अनुदान न मिळाल्याने तीन रुग्णवाहिका गेल्या तीन महिन्यांपासून रुग्णालयासमोर उभ्या आहेत. परिणामी गर्भवती, प्रसूती झालेल्या महिलांना त्यांच्या घरापर्यंत सोडण्याची अडचण निर्माण झाली आहे.
कंत्राटी डॉक्टरांचे वेतनही थकले जिल्ह्यातील नवेगावबांध, सालेकसा, अर्जुनी मोरगाव, चिचगड, आमगाव या पाच रुग्णालयांचा कारभार हा कंत्राटी तत्त्वावर नियुक्त डॉक्टरांच्या भरव- शावर सुरू आहे. पण या कंत्राटी डॉक्टरांचे वेतनसुद्धा गेल्या तीन-चार महि- न्यांपासून शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने थकले आहेत.
जिल्ह्यात ५६ शासकीय रुग्णवाहिकायेथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयासह, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात एकूण ५६ रुग्णवाहिका आहेत. प्रति रुग्णवा- हिकेचा महिन्याकाठीचा खर्च ८० हजार रुपये आहे. पण तेवढा निधी उपलब्ध होत नसल्याने या समस्येत वाढ होत आहे. येत्या पंधरा दिवसांत शासनाने निधी उपलब्ध न करुन दिल्यास या ५६ रुग्णवाहिकांची चाके थांबण्याची शक्यता असून यामुळे बिकट समस्या निर्माण होऊ शकते.
१० लाखांच्या निधीची मागणी येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालय व्यवस्थापनाने शासनाकडे रुग्णवाहि- कांसाठी १० लाख रुपयांचा निधी त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच गेल्या तीन महिन्यांपासून यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. पण अद्यापही निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही.
"रुग्णवाहिका सुरळीत सुरू ठेवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून निधीची समस्या असून काही रुग्णवाहिका या रुग्णालयासमोरच उभ्या आहेत, शासनाकडून यासाठी लवकरच निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे." - डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक