पत्रकार व पोलिसांना मारहाण : गोंदियात अतिक्रमण हटाव मोहिमेत व्यापाऱ्यांकडून बळाचा वापर गोंदिया : शहरातील वाढत्या अतिक्रमणावर आळा बसावा यासाठी नगर परिषदेने शुक्रवारी (दि.७) शहरात राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला काही व्यापाऱ्यांच्या आततायीपणामुळे गालबोट लागले. ही मोहीम सुरू असताना चांदणी चौक परिसरातील व्यापाऱ्यांनी चक्क पोलीस, पत्रकार आणि नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यामुळे अतिक्रमणकर्त्या व्यापाऱ्यांवर सर्व स्तरातून रोष व्यक्त करण्यात आला. दरम्यान धुडगूस घालणाऱ्या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी सी.ए.राणे यांच्या उपस्थितीत ही अतिक्रमण हटाव मोहिम शुक्रवारी (दि.७) दुपारी १२ वाजतापासून सुरू करण्यात आली. स्टेडियम परिसरातील फुटपाथ दुकानांपासून या मोहिमेची सुरूवात झाली. पोलिसांच्या मदतीने रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले. थोड्याफार बाचाबाचीनंतर तेथील मोहिम आटोपून पथक गोरेलाल चौक मार्गे चांदनी चौक परिसरात गेले. मात्र त्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी मोहिमेला विरोध केला. दुपारी ३ वाजतादरम्यान जेव्हा येथे अतिक्रमण हटाव मोहिम सुरू होती तेव्हा अचानक काही लोकांनी साध्या वेषात शुटींग करीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा कॅमेरा हिसकावून घेतला व त्याला कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. दरम्यान महिला पोलीस कर्मचारी प्रधान मधात पडल्या असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. एवढेच नव्हे तर, नगर परिषद कर्मचाऱ्यांसोबत पत्रकार नवीन अग्रवाल यांनाही मारहाण करण्यात आली. ते एका ट्रॅक्टरवर उभे राहून फोटो घेत होते व मारहाणीत त्यांच्या हातांच्या बोटांना व शरीरावरही काही ठिकाणी मार लागला. त्यामुळे अतिरिक्त पोलीस बल बोलावून घेण्यात आले. नगराध्यक्ष अशोक इंगळे व मुख्याधिकारी चंदन पाटील हे सुद्धा घटनास्थळी पोहचले. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते व शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश शुक्ला यांनीही घटनास्थळ गाठले. कामात अडथळा आणत असलेल्या चार-पाच जणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यांत पाठविण्यात आले. यानंतर अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेची गती वाढली असताना तेवढ्याच अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांनी मोठा विरोध सुरू केला. सायंकाळी ४ वाजतादरम्यान आकाश गोलानी, गिरीश गोलानी व त्यांच्या दोन भावडांनी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत धक्काबुक्की केली. यातच एकाने शुटींग करीत असलेल्या पत्रकाराचा हात पकडून थक्काबुक्की केली. (शहर प्रतिनिधी) पोलिसांनी घेतले सात जणांना ताब्यात पत्रकार व पोलिसांवर हल्ला करणाऱ्या सात व्यापाऱ्यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात भरत चंद्रपाल गोलानी (४६) रा.आशीर्वाद कॉलनी गोंदिया, गिरीष प्रकाश गोलानी (२५) रा. सिंधी कॉलनी, आकाश देवचंद गोलानी (२५), शंकर चौक, सिंधी कॉलनी, गुड्डू दुलिचंद ककवानी (४२) रा.सिंधी कॉलनी, नरेश चंद्रपाल गोलानी (४४) रा.आशीर्वाद कॉलनी, निरंजन अशोक मानकानी (१८) श्रीनगर व जय इंद्रकुमार गोलानी (३५) रा.आदर्श कॉलनी, सिंधी कॉलनी गोंदिया यांचा त्यात समावेश आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोरांवर कारवाईसाठी पत्रकार एकवटले राज्य सरकारने शुक्रवारी पत्रकार संरक्षण कायदा पारित केला असताना दुसरीकडे गोंदियात कर्तव्य पार पाडणाऱ्या पत्रकारावर हल्ला होण्याच्या प्रकाराचा प्रेस ट्रस्ट आॅफ गोंदिया, जिल्हा श्रमिक पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक मिडिया संघाने निषेध व्यक्त केला. हल्लेखोरांवर कडक कायदेशिर कारवाई करण्याची मागणी शहर ठाण्याचे निरीक्षक दिनेश शुक्ला यांची भेट घेऊन करण्यात आली. यावेळी सर्व प्रमुख वर्तमानपत्रांचे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अतिक्रमण हटाव मोहिमेत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 00:46 IST