गोंदिया : गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सोसायटीची ऑनलाईन सर्वसाधारण सभा शनिवारी (दि.२७) सोसायटीचे अध्यक्ष वीरेंद्र कटरे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. या सभेत शिक्षकांच्या हिताचे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात शिक्षकांना २५ लाखापर्यंत कर्ज दिले जाणार असून सभासदांच्या लाभांशात ३ टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. आधार संजीवनी योजनेची मर्यादा तीन लाखांवरून पाच लाखांवर करण्यात आल्याचे महत्वपूर्ण निर्णय या आमसभेत घेण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, सडक-अर्जुनी येथे महिला मेळावा व शिक्षक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका सरचिटणीस किशोर बावनकर यांनी आपल्या प्रास्ताविकेत शिक्षकांची २५ लाख कर्ज मर्यादा वाढविणे, व्याज दर कमी करणे, डीसीपीएस बांधवांची संजीवनी योजनेची मर्यादा वाढविणे, एलआयसीमध्ये शिक्षकांचा विमा काढणे, डिव्हिडंट ७ टक्के वरून वाढवून १० टक्के करावे अशी मागणी केली होती. त्यावेळी वचनपूर्ती करण्याचे आश्वासन कटरे यांनी दिले होते. ती वचनपूर्ती शनिवारी (दि.२७) झालेल्या सभेत करण्यात आली असून शिक्षकांची २७ लाख कर्ज मर्यादा व लाभांशात ३ टक्के वाढ, आधार संजीवनी योजनेची मर्यादा तीन वरून पाच लाख, सभासदांच्या सुरक्षा योजनेत वाढ करून सात ऐवजी १५ लाख करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सडक-अर्जुनीचे पी.एम. मेश्राम, किशोर बावनकर, विजय डोये, शरद साखरे, भीमराव गहाने, एकनाथ इरले, देवेन्द्र बनकर, बी.एम. भेंडारकर, राहुल कोनतमवार, भाष्कर शिवणकर, सुरेश अमले, घनश्याम मेश्राम, भूमेश बडोले, अविनाश पाटील, विजय फुलबांधे, जी. सी. पाटणे यांनी कटरे यांचे आभार मानले.