लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मुला-मुलींचे लग्न जमवणे, हा आयुष्यातील नाजूक विषय असतो. कन्येला चांगला शोभेल, असा जोडीदार मिळावा किंवा मुलाला सुस्वरूप मुलगी पत्नी म्हणून मिळावी, अशी इच्छा सर्वच पालकांची असते; मात्र याच इच्छा आकांक्षांना कॅश करण्याचा नवीन धंदा आता जोर धरू लागला आहे. यातून अनेक पालकांची फसवणूक झाल्याचे प्रकार उजेडात आले आहेत.
विविध व्हॉट्सअॅप ग्रुपवर फिरणाऱ्या विवाह इच्छुकांचे बायोडाटा हेरून त्यावरील पालकांच्या व्हॉट्सअॅपवर सुस्वरूप, उच्चशिक्षित मुला-मुलींचे फोटो व पत्ता, संपर्क नंबर नसलेले अपूर्ण फेक बायोडाटा पाठवून प्रथम पालकांना जाळ्यात ओढले जाते. नंतर तुम्हाला अधिकची माहिती हवी असल्यास आमची नोंदणी फी भरून उर्वरित माहिती पाठवली जाईल, असे सांगून २ ते १५ हजार रुपयांपर्यंत रक्कम उकळली जाते. अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार हल्ली वाढले आहेत. अशा प्रकारापासून सावध राहण्यासाठी संपूर्ण माहिती व माहितीचा स्रोत जाणून घ्या मगच पुढचा निर्णय घ्यावा, असे जाणकार सांगतात. मोठ्या जमीनदारांकडेही आता जमीन बिघ्यावर आली आहे.
फसवणुकीचा प्रकार लग्न जमविताना स्वजातीच्या घराण्यात जमविण्याकडे वधू-वर पालक कटाक्षाने पाहतात. आंतरजातीय विवाहांना शासन मान्यता असली, तरी अद्याप समाजमान्यता देत नाही. मात्र, पैसे उकळण्यासाठी काही एजंटांनी दुसऱ्या जातीतही लग्न जमविल्याची चर्चा ऐकावयास मिळते. काही वधू-वर सूचक मंडळे हे काम वेगळ्या जाणिवेने करीत आहेत. तर काही याकडे व्यवसाय म्हणूनच पाहत आहेत.
लग्न जुळविणे आता झाला व्यवसाय पूर्वी लग्न ठरविणे, इच्छुक वधू-वरांची ओळख करून देणे, एक नवा संसार सुरू करण्यासाठी पुढाकार घेणे, वधू- वराकडील मंडळींना एकमेकांविषयी खरीखुरी माहिती देण्याची कामे केल्याने ईश्वराची सेवा केल्याचे पुण्य प्राप्त होते, असे समजून लग्न जुळविली जात होती; मात्र लग्न जमविणे, ही समाजसेवा न राहता त्याकडेही व्यवसाय म्हणून बघितले जाऊ लागले आहे.
संपर्काचा अभाव लग्न जमविणे, हे काम पूर्वी नातेवाईक मंडळी कोणत्याही लाभाचे गणित न मांडता करायचे. मात्र सद्यस्थितीत लग्न जमविताना थकलेले पालक अशा धंदेवाईक वधू-वर सूचक मंडळींचे लक्ष्य ठरत आहेत. विभक्त कुटुंबपद्धती, नातेवाइकांचा कमी झालेला संपर्क, प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना यामुळे एजंटांचे महत्त्व वाढीस लागले आहे. कामामुळे नातेवाइकांकडे येणे-जाणे कमी झाले आहे. आप्तेष्टांकडे कार्यक्रमांव्यतिरिक्त जाणे होत नसल्याने अशी मंडळी या एजंटकडे चकरा मारतात.