लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : भरधाव कारने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलस्वारसह दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर कार चालक जखमी झाला. ही घटना तालुक्यातील वडेगावजवळ रविवारी (दि. ६) दुपारी ३.३० वाजता घडली. हिरदेसिंग आसाराम टेकाम (७०) रा. मंगेझरी, संपत ठूररी आहाके (६५), प्रताप संपत आहाके (३४) रा. कोडेबर्रा, तालुका तिरोडा असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर चिंतामण रहांगडाले असे जखमी कारचालकाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, तिरोडा तालुक्यातील सर्रा येथील शिक्षक यांच्या मुलाचे रिसेप्शन रविवारी होते. त्यासाठी टेकाम व आहाके हे मोटारसायकलने सर्रा येथे जात होते. तर सर्रा येथून तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चिंतामन रहांगडाले आपल्या स्वीफ्ट कारने (क्रमांक एमएच ३५ - एएन २१२१) तिरोड्याकडे परत जात होते. रहांगडाले यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्यांनी समोरून येणाऱ्या मोटारसायकलला वडेगावजवळ धडक दिली. यात मोटारसायकलस्वार व दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कार सुद्धा उलटून जवळपास ५० फूट रस्त्याच्या कडेला फरफटत गेली. त्यामुळे कार चालक चिंतामन रहांगडाले हे सुद्धा जखमी झाले. वडेगाव येथील गावकऱ्यांनी जखमीला लगेच तिरोडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती तिरोडा पोलिसांना दिली. माहिती मिळताच तिरोडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.