गोंदिया : बाई गंगाबाई स्त्री व बाल रुग्णालयात २६ फेब्रुवारी ते १२ मार्च दरम्यान सुरु असलेल्या महिला आरोग्य अभियान पंधरवाडानिमित्त ८ मार्च रोजी मोफत कॅन्सर स्क्रिनिंग शिबिर पार पडले.जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या मोफत कॅन्सर निदान व उपचार शिबिराचे उद्घाटन जिल्हा प्रसुती तज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्ष डॉ. चिटणवीस यांच्या हस्ते फ्लोरेन्स नार्इंटींगेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्ज्वलनाने झाले.अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव दोडके होते. अतिथी म्हणून निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमरीश मोहबे, समाजसेविका सविता बेदरकर, लोकमत सखी मंचच्या जिल्हा संयोजिका दीपा भौमिक, रक्त संक्रमण अधिकारी सुवर्णा हुबेकर, प्रसुती तज्ज्ञ सायस केंद्रे, डॉ. पीनम पारधी उपस्थित होते. चाळीशी नंतर स्त्रियांचे कॅन्सरचे प्रमाण, कॅन्सरचे लक्षण, निदान व उपचार याबाबत मार्गदर्शन स्लाईड शोद्वारे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी उपस्थित महिलांना सांगितले.जागतिक महिला दिनाच्या पर्वावर आतातरी महिलांनी स्वत:च्या आरोग्यासाठी, दिर्घायुष्यासाठी आरोग्य तपासण्यासाठी वेळ काढावो, असे आवाहन प्रा. सविता बेदरकर यांनी सर्व महिलांना आवाहन केले. डॉ. चिटणवीस यांनी आपल्या मार्गदर्शनात, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर व स्तन कॅन्सर हे महिलांमधील सांयलेट किलर आहेत. त्यामुळे साध्या सोप्या पद्धतीच्या स्क्रिनिंग पद्धती जसे सर्व्हायकल पॅप्स स्मिअर व स्तर कॅन्सरसाठी मॅनोग्राफी व सायटॉलॉजी आदी तपासण्या सरसकट चाळीशीच्या महिलांनी नियमितपणे करुनच घेतले पाहिजे. जिल्हा संघटना अशा प्रकारच्या मोफत शिबिरांना मदतच करेल. वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव दोडके यांनी महिला आरोग्य अभियानाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन केले व जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. या शिबिरात एकूण ६३० महिलांची मोफत कॅन्सर स्क्रिनिंग करण्यात आली. डॉ. दुर्गाप्रसाद पटले, डॉ. पुनम पारधी, डॉ. भावना बजारे, डॉ. गरिमा मिश्रा, डॉ. नाकाडे, डॉ. सोनारे, डॉ. अर्चना चौहान, डॉ धाबेकर, डॉ. तृप्ती कटरे, डॉ.आनंद, डॉ. माली, डॉ. कांबळे आदी वैद्यकीय विशेष तज्ज्ञांनी महिलांची तपासणी व मोफत उपचार केले. (प्रतिनिधी)
६३० महिलांची कॅन्सर तपासणी
By admin | Updated: March 12, 2015 01:18 IST