विजय मानकर - सालेकसा गरिबांना विविध आजारांवर वेळेवर योग्य व मोफत आरोग्य सेवा मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली. ही योजना महाराष्ट्रातील गरीब असहाय व एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी मोठे वरदान ठरत आहे. परंतु जवळ पास सहा महिने लोटूनही सालेकसा तालुक्यात आतापर्यंंत ३७ टक्के लोकांच्या हातीच या योजनेचे कार्ड मिळाले आहेत. या मागे संबंधित ग्रामपंचायतींचे कर्मचारी, पदाधिकारी जातीने लक्ष देत नसून या योजनेबद्दल लोकांमध्ये आतापर्यंंत पुरेशा प्रमाणात जनजागृती निर्माण करण्यात आली नाही, असे दिसून येत आहे. तालुक्यात एकूण १७ हजार ४९४ कुटुंबसंख्या असून त्यापैकी १२ हजार ४५0 कुटुंबाचे कार्ड प्राप्त झाले. त्यात आठ हजार ८0 कुटुंबाचे कार्ड प्रिंट करण्यात आले व त्यापैकी सहा हजार ५५२ कुटुंबांना कार्ड वितरीत करण्यात आले. यानुसार तालुक्यात कार्ड तयार झाल्याची टक्केवारी ४६.१९ असून प्रत्यक्षात ३७.४५ टक्के कुटुंबाच्या हातीच कार्ड मिळाले आहेत. यावरुन असे दिसते की, राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या कामात असलेली यंत्रणा आपले काम संथगतीने करीत आहे. तर तालुक्यात लोकांमध्ये जागृतीची कमी असल्याने लोक शासनाच्या योजनेचा वेळेवर योग्य प्रकारे लाभ घेताना दिसत नाही. तालुक्यात एकूण ४३ ग्रामपंचायती असून या योजनेसाठी प्रत्येक ग्राम पंचायतीत एक संग्राम कक्ष स्थापीत करण्यात आला आहे. त्याप्रमाणे एकूण ४३ संग्राम कक्ष कार्यरत आहेत. यात प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध अंतर्गत १५, प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव अंतर्गत १0, बिजेपार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आठ आणि दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १0 संग्राम कक्ष कार्य करीत आहेत. त्याचप्रमाणे तालुक्यात एकूण पाच कॉमन सर्विस केंद्र असून त्यापैकी तीन कॉमन सर्विस केंद्र कार्यरत तालुक्यात एकूण चार प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश असून प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध अंतर्गत १५ ग्रामपंचायतीत पाच हजार ६३0 कुटुंब संख्या आहे. यातील पाच हजार २५0 कार्ड प्राप्त झाले. त्यापैकी २ हजार ४७४ कार्ड प्रिंट झाले आणि २ हजार ६९ कार्ड वितरित झाले. सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कुटुंब संख्या तीन हजार ३0२ असून दोन हजार ५00 कार्ड प्राप्त झाले. त्यात ९0६ कार्ड प्रिंट झाले आणि ६५३ कार्ड वितरीत झाले आहेत. बिजेपार प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कुटुंबसंख्या ३ हजार २८५ असून एकूण १ हजार ७00 कार्ड प्राप्त झाले. त्यापैकी सर्व कार्ड प्रिंट झाले असून ९५६ कार्ड वितरीत करण्यात आले. दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कुटुंबसंख्या पाच हजार २७७ असून एकूण तीन हजार कार्ड प्राप्त झाले व सर्व प्रिंट झाले. त्यापैकी दोन हजार ८५४ कार्ड लाभार्थ्यांंना वितरीत करण्यात आले. तालुक्यात एकूण ४६.१९ टक्के कार्ड प्रिंट झाले यात कावराबांध ४३.९४ टक्के, सातगाव सर्वात कमी २७.४४ टक्के, बिजेपार ५१.७५ टक्के आणि दरेकसा क्षेत्र दुर्गम आदिवासी असूनसुद्धा येथे सर्वाधिक ५६.८५ टक्के कार्ड तयार झाले आहेत. शिल्लक लाभार्थी संख्या एकूण ९ हजार ४१४ असून यात कावराबांध तीन हजार १५६, सातगाव २ हजार ३९६, बिजेपार १ हजार ५८५ आणि दरेकसा २ हजार २७७ एवढी आहे. वरील आकडेवरून फक्त फक्त ३७ टक्के कुटुंबांपर्यंंतच योजनेचे कार्ड आल्याचे दिसून येते.
३७ टक्के कुटुंबाकडेच जीवनदायी योजनेचे कार्ड
By admin | Updated: May 12, 2014 23:52 IST