लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येला मागील तीन चार दिवसांपासून ब्रेक लागला असून बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. बुधवारी (दि.२) तब्बल ३६२ बाधितांनी कोरोनावर मात केली तर १३१ नवीन बाधितांची नोंद झाली.कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी १०८७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ७३१ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ३५६ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात १३१ नमुने कोरोनाबाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट १२.३३ टक्के आहे. मागील तीन चार दिवसापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून मात करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्याभोवतीचा कोराेनाचा विळखा आता सैल होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ५००९५५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात २६७५८३ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २३३३७२ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४५५२४ नमुने कोरोनाबाधित आढळले. यापैकी ४३८७३ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ९२९ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून यापैकी ८९३ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. जिल्ह्याचा एकूण पॉझिटिव्हिटी रेट ९.१९ टक्के आहे.
९० टक्क्यावर लसीकरणामुळे निर्बंध शिथिल- कोरोना विरुध्दच्या लढ्यात लसीकरण हेच महत्वपूर्ण शस्त्र आहे. हीच बाब गांभीर्याने घेत जिल्हा व आरोग्य प्रशासनाने प्रतिबंधात्मक लसीकरणावर अधिक भर दिला. जिल्ह्यातील १० लाख २५ हजार ६६८ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून त्याची टक्केवारी ९३.५२ टक्के आहे. तर दुसरा डोस ७ लाख २६ हजार ६८ नागरिकांनी घेतला असून त्याची टक्केवारी ६९.५४ टक्के आहे. तर १५ ते १७ वयोगटातील मुलांचे ६३.३६ टक्के लसीकरण झाले असून ६४६५ नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे. त्यामुळेच शासनाने पहिल्याच टप्प्यात जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले आहे.