गोंदिया : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशूच्या अतिदक्षता कक्षाला आग लागून दहा निष्पाप बालकांचा बळी गेला. या घटनेने केवळ महाराष्ट्रच नव्हे संपूर्ण देश हादरला. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने खडबडून जागे होत सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर आणि इलेक्ट्रिक ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र जिल्ह्यातील ३१३ आरोग्य संस्थाचे इलेक्ट्रिक आणि २९८ आरोग्य संस्थांचे अनेक वर्षांपासून फायर ऑडिटच करण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे भंडारा येथील घटनेची जिल्ह्यात पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आराेग्य संस्थेत २४ तास वीज व पाण्याची सुविधा असणे आवश्यक आहे. ही सोय करण्यात आली परंतु इतर सोयींकडे दुर्लक्ष केले जात आहे. जिल्ह्यातील ३१३ आरोग्य संस्थांचे इलेक्ट्रिक ऑडिट अनेक वर्षांपासून झालेच नाही. ग्रामीण भागात आरोग्यसेवा देणारे प्राथमिक आरोग्य केंद्र ४० व उपकेंद्र २५८ अशा २९८ आरोग्य संस्थांचे फायर ऑडिटही झाले नाही. जिल्ह्याची परिस्थिती पाहता गोंदिया जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय, एक महिला रुग्णालय, एक जिल्हा सामान्य रुग्णालय, एक उपजिल्हा रुग्णालय, ११ ग्रामीण रुग्णालये, ४० प्राथमिक आरोग्य केंद्र व २५८ उपकेंद्र अशा एकूण ३१३ आरोग्य संस्था आहेत. या संस्थांचे नियमित फायर ऑडिट व इलेक्ट्रिक ऑडिट होणे आवश्यक आहे. परंतु जिल्हा ठिकाणच्या आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट केले जाते. परंतु इलेक्ट्रिक ऑडिट केले जात नाही. यापेक्षाही दुरवस्था ग्रामीण भागातील आहे. या ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांचे ना फायर, ना इलेक्ट्रिक ऑडिट करण्यात आले. रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी फायर ऑडिट व इलेक्ट्रिक ऑडिट होणे आवश्यक असताना याकडे आरोग्य संस्थांचे अधिकारी याकडे लक्ष देत नाही. गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालय, केटीएस, गंगाबाई स्त्री रुग्णालय, तिरोड्याचे उपजिल्हा रुग्णालय व ११ ग्रामीण रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले. परंतु त्यांचे इलेक्ट्रिक ऑडिट अनेेक वर्षांपासून झालेच नाही. या आरोग्य संस्थेतील विद्युत वायर इकडे-तिकडे पडून असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
बॉक्स
पीएचसी व उपकेंद्रांच्या इमारती चकाचक पण सुरक्षा वाऱ्यावर
ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची धुरा सांभाळणाऱ्या ४० प्राथमिक आरोग्य केंद्र, २५८ उपकेंद्राचे फायर किंवा इलेक्ट्रिक ऑडिट वर्षानुवर्षापासून झाले नाही. ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी एक असे अग्निशमन यंत्र बसविण्यात आले. परंतु त्यांचे ऑडिट झाले नाही. २५८ उपकेंद्राचे फायर किंवा इलेक्ट्रिक ऑडिट सोडा त्यात साधे अग्निशमन यंत्र अद्याप लागलेले नाही. या ठिकाणी आग लागल्यास ती आग विझविण्यासाठी कोणतेही उपाययोजना नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
बॉक्स
४ ग्रामीण रुग्णालयांच्या इमारती जीर्ण
गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांच्या इमारती चांगल्या आहेत. परंतु बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाची इमारत, देवरी, सालेकसा व चिचगड या चार आरोग्य संस्थांच्या इमारती जीर्ण अवस्थेत आहेत. या इमारतींच्या बांधकामाकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.