लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने 'स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियान अंतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या २० प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी ललित कुकडे यांनी दिली.
या अभियानांतर्गत तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच देवरी व चिचगड येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी हे उपक्रम राबविण्यात येणार असून या शिबिरांचा लाभ सर्व माता, मुली, महिलांनी घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी ललित कुकडे यांनी केले आहे. महिलांमध्ये आरोग्य विषयी जागरूकता वाढविण्यासाठी आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे अभियान देशभर राबविण्यात येत आहे. महिलांच्या आरोग्य तपासणीसह उपचार व आवश्यक संदर्भसेवा व समुपदेशन करण्यात येणार आहे.
ग्रामीण, शहरी महिलांना आरोग्य विषयी जागृत करणे आणि त्यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या शिबिरांमध्ये महिलांच्या स्तन आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचे निदान यामध्ये विशेष तज्ज्ञ यांच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. तालुक्यात तालुका वैद्यकीय अधिकारी ललित कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ व ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर व परिचारिका यांच्या नियोजनाखाली हे शिबिर होणार असून तालुक्यातील सर्व महिला भगिनींनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी ललित ककडे यांनी केले आहे.
या केल्या जाणार तपासण्या
रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दात रोग तपासणी, स्तन व गर्भाशय, मुख व मुख कर्करोग तपासणी, गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण सेवा, रक्त व हिमोग्लोबिन तपासणी, क्षयरोग तपासणी, सिकलसेल आजार व रक्तक्षय तपासणी, विशेष तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन निरोगी जीवनशैली आणि पोषण, स्थानिक व क्षेत्रीय आहाराला प्रोत्साहन देणे.