दिलीप चव्हाण - गोरेगावतालुक्यातील जवळपास १८२ शेतकरी गेल्या दिड वर्षापासून शेतात वीजमीटर लावण्याच्या प्रतीक्षेत आहेत.विद्युत वितरण कंपनीच्या वतीने कृषी पंप विद्युत जोडणी उपक्रम राबविले जाते. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी पंपाने मुबलक पाणी मिळावे म्हणून विद्युत मीटर लावून देण्याचे निकष आहे. यासाठी ६ हजार ६०० रुपये डिमांड म्हणून विद्युत वितरण कंपनीकडे जमा करावे लागते. या विद्युत मीटरसाठी कटंगी, कुऱ्हाडी, पाथरी, गोरेगाव, झांजिया, दवडीपार, मोहाळी, तिल्ली, गौरीटोला, पालेवाडा, पलखेडा, मुरदोली, गणखैरा, बोरगाव, सुकपूर, हिरापूर, कालीमाटी, आंबेतलाव व इतर काही गावातील १८२ शेतकऱ्यांनी विद्युत मीटरसाठी डिमांड भरून रितसर अर्ज केले आहे. मात्र दिड वर्षाचा कालावधी लोटूनही विद्युत वितरण कंपनीने त्या शेतकऱ्यांना विद्युत मीटरची जोडणी केलेली नाही. शेतकऱ्यांच्या शेतात मीटरची जोडणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. तालुक्यात चार हजार हेक्टरमध्ये रब्बी पीक, २४ हजार हेक्टरमध्ये खरीप पीक घेतले जाते. यातील तीन हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येते. तर तीन हजार ५०० हेक्टर शेतजमीन सरंक्षित ओलिताखाली येते. तालुक्यातील बहुतेक शेतकरी रब्बी पिकात चना, उळीद, गहू, बाजरी, धान, तुळ या कडधान्यांची लागवड करतात. रब्बी पीक उन्हाळ्यात घेताना पाण्याची गरज भासते. यासाठी शेतकरी डिझेल पाणीपंप लावून शेताला पाणी पुरवितो. मात्र यामुळे शेतकऱ्याला अधिकचा भुर्दंड सहन करावा लागतो. शेतकऱ्यांना कमी दरात वीज उपलब्ध करुन देण्यासाठी शासन पातळीवर अनेक योजना आहेत. पण शासनाच्या या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाही. शासनाच्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहचत नाही किंवा पोहचविल्या जात नाही? तालुक्यातील जागृत शेतकऱ्यांनी शासनाच्या विद्यत मीटरसाठी गेल्या दीड वर्षापासून अर्ज केले आहे. पण अजूनही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वीज पोहचली नाही. शेतकऱ्यांना विद्युत मीटर लावण्यासाठी कृषी मंत्रालयाकडून अनुदान देण्यात येते. मात्र कृषी मंत्रालयाने फेब्रुवारी २०१३ पासून विद्युत वितरण कंपनीला अनुदान दिले नसल्यामुळे विद्युत वितरण कंपनीही हतबल झाली आहे. शेतकऱ्यांनी डिमांड भरले असून शेतकरी दररोज वीज वितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. मीटरची जोडणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांची पिके मरणासन्न परिस्थितीत आहेत.पिकांना पाणी होत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके करपण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विद्युत वितरण कंपनीविरूध्द असंतोष खदखदत आहे. शेतकऱ्यांना स्वस्तात वीज उपलब्ध करण्यासाठी २.१० पैसे युनिटचे दर विद्युत वितरण कंपनीने आखले आहे. यापैकी ५४ पैसे शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीकडे भरावे लागते तर उर्वरीत पैसे कृषी मंत्रालय विद्युत वितरण कंपनीकडे भरते.शासनाच्या विविध योजना असल्या तरी त्या योजनांची अंमलबजावणी वेळेवर होत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखविली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांत आणखीनच वाढ होत आहे.
तालुक्यातील १८२ शेतकरी विद्युत मीटरच्या प्रतीक्षेत
By admin | Updated: July 3, 2014 23:39 IST