गोंदिया : ११ कोटींच्या करवसुलीसाठी येथील नगरपरिषदेने कंबर कसली असून करवसुली मोहीम जोमात राबविली जात आहे. १९ जानेवारी पासून राबविण्यात येत असलेल्या या करवसुली मोहिमेंतर्गत पथकाने महिनाभरात सुमारे एक कोटी ७१ लाख ४९ हजार १६२ रूपयांची करवसुली केली आहे. यात जानेवारी महिन्यात ९१ लाख ७५ हजार ५५१ रूपयांची करवसुली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे करवसुलीला घेऊन शहरवासीयांना माहिती व्हावी यासाठी शहरात मुनादी केली जात आहे. तर करवसुली अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले नायब तहसीलदार निलेश पाटील अद्यापही रूजू झालेले नाहीत. तरिही करवसुली मोहीम जोमात सुरू असून दिवसेंदिवस वसुलीची आवकडेवारी वाढतच चालली आहे. चालू वर्षातील कर व थकबाकी अशी एकूण ११ कोटींची रक्कम नगरपरिषदेला शहरवासीयांकडून वसूल करायची आहे. दरवर्षी करवसुलीचे हे डोंगर वाढतच चालले असून याचा परिणाम नगरपरिषदेला शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावर पडतो. करवसुलीची गंभीर बाब लक्षात घेत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची करवसुलीसाठी एक दिवस क्लास घेतली होती. तसेच सर्वांचे तीन महिन्यांचे पगार थांबवून ठेवले होते. यावर पालिकेने करवसुलाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे करवसुली अधिकाऱ्यांची मागणी केली होती. तसेच करवसुली पथक तयार करून १९ जानेवारीपासून शहरात करवसुली मोहिमेचा श्रीगणेशा केला. मोहिमेच्या सुरूवातीला शहरातील काही व्यापाऱ्यांनी पथकावर आपला रोष व्यक्त करीत राजकारण मधात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र खुद्द मुख्याधिकारी सुमंत मोरे हे स्वत: मैदानात उतरल्याने शेवटी मोहिमेला प्रतिसाद मिळू लागला आहे. विशेष म्हणजे कर वसुली अधिकारी रूजू झाले नाही. अन्यथा कर वसुलीची ही मोहीम अधिक तिव्र स्वरूपात राबविता आली असती. (शहर प्रतिनिधी)जानेवारी महिन्यात ९१.७५ लाखांची वसुली१९ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेंतर्गत पथकाने या महिन्यात ९१ लाख ७५ हजार ५५१ रूपयांची करवसुली केली आहे. यात ५३ लाख ५० हजार २०४ रूपयांची रोख व चेक तर ३८ लाख २५ हजार ३४७ रूपयांचे पोस्ट डेटेड चेक्स प्राप्त झाले. शिवाय फेबु्रवारी महिन्यात २१ तारखेपर्यंत ७२ लाख १३ हजार ४०३ रूपयांची रोख व चेक तसेच सात लाख ६० हजार २०८ रूपयांचे पोस्ट डेटेड चेक्स मिळविले आहेत. अशाप्रकारे या महिनाभराच्या कालावधीत पथकाने एक कोटी ७१ लाख ४९ हजार १६२ रूपयांची करवसुली केली आहे. या वर्षात सुमारे चार कोटी वसूल मागील वर्षापर्यंत नगरपरिषदेच्या करवसुली विभागाचा हवेतच कारभार सुरू होता. परिणामी थकबाकीचा आकडा वाढतच चालला होता व आजघडीला ११ कोटी पर्यंत पोहचला आहे. वाढत्या थकबाकीमुळे अखेर करवसुली विभागाला करवसुलीसाठी कंबर कसावी लागली. परिणामी यावर्षात सुमारे चार कोटींची करवसुली विभागाने केली आहे. शिवाय फेब्रुवारी महिन्याचे काही दिवस व पूर्ण मार्च महिना करवसुलीसाठी उरला आहे. यात आणखीही मोठी रक्कम वसुल करता येईल. मात्र मागील वर्षी फक्त तीन कोटी ८५ लाख रूपयांचीच करवसुली झाली होती हे विशेष.
महिनाभरात १.७१ कोटींची करवसुली
By admin | Updated: February 23, 2015 02:00 IST