गोंदिया : नागपूर-गोंदियादरम्यान रेल्वे मॅजिस्ट्रेट यांच्या उपस्थितीत व सहायक वाणिज्य व्यवस्थापक यांच्या नेतृत्वात तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या विशेष तिकीट तपासणी अभियानात १६९ अनियमित रेल्वे प्रवासाची प्रकरणे आढळली. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाद्वारे ११ मार्च रोजी विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. यात अनियमित प्रवासाचे १६९ प्रकरणांची नोंद करण्यात आली. यात महिला बोगींमध्ये पुरूषांद्वारे प्रवास, अनधिकृत व्हेंडर, दुधाचे डबे अनधिकृतपणे स्लिपर क्लॉसमध्ये नेणे आदी प्रकरणांचा समावेश आहे. या प्रकरणांमध्ये आरोपींकडून ४६ हजार ९८० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय १२ मार्च २०१६ रोजी गोंदियात किलेबंदी चेकिंग अभियानांतर्गत विना तिकीट, अनियमित प्रवास व सामान बुक न करताच लगेज नेण्याचे एकूण ६२५ प्रकरणे पकडण्यात आले. यात आरोपींकडून दंडस्वरूपात एक लाख २६ हजार ५८५ रूपये वसूल करण्यात आले. तसेच केरकचरा पसरविण्याबाबतचे २८ प्रकरणे पकडण्यात आले. त्यांच्याकडून २ हजार ७५० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. १३ मार्च २०१६ पर्यंत एकूण ११ हजार ८२४ प्रकरणे पकडण्यात आले. त्यांच्याकडून २४ लाख ७३ हजार ४८ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
अनियमित रेल्वे प्रवासाची १६९ प्रकरणे नोंद
By admin | Updated: March 17, 2016 02:27 IST