गोंदिया : आंगणवाडीसाठी सहायक आंगणवाडी सेविका पदभरती करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले. परंतु त्या आंगणवाडी सेविकांची मुलाखत घेण्याचे आदेश आतापर्यंत न मिळाल्यामुळे एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे काम थंड बस्त्यात आहे. गोंदिया जिल्ह्यात ९ प्रकल्पांतर्गत १ हजार ५८० नविन अतिरीक्त आंगणवाड्या उघडण्याची मंजूरी मिळाली आहे. त्यासाठी २२ आॅगस्ट रोजी अर्ज मागविण्यात आले होते. ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या संख्येत आपापल्या तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयात अर्ज सादर केले. गोंदिया प्रकल्प क्र. १ मध्ये १७६, प्रकल्प क्र. २ मध्ये १५६, आमगाव येथे १५३, देवरी येथे १८९, गोरगाव येथे १७१, सडक/अर्जुनी येथे १५४, तिरोडा येथे १७४, सालेकसा येथे १९९ व अर्जुनी/मोरगाव प्रकल्प कार्यालय अंतर्गत २०८ पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. यात १ हजार ५८० आंगणवाडी सेविकांची भर्ती करण्याचे शासनाचे निर्देश आहे. गोंदिया प्रकल्प क्र. १ मध्ये १हजार ९८३ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.गोंदिया प्रकल्प क्र. २ येथे १ हजार ३०० पेक्षा अधिक, आमगाव येथे २ हजार २१८, देवरी येथे १ हजार ३८० अर्ज, गोरेगाव येथे १ हजार ९८३, सालेकसा येथे १ हजार ५७४ अर्ज आले आहेत. सडक/अर्जुनी तालुक्याचे प्रकल्प अधिकारी एफ.सी.बोबडे यांनी आपल्या तालुक्यातील अर्जाची मोजणी झालीच नाही, असे सांगितले. १७०० ते १८०० अर्ज आले असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. तिरोडा तालुक्यात २ हजार अर्ज आल्याची माहिती प्रकल्प अधिकारी ढोरे यांनी दिली. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अर्जाची तपासणी करण्याचा वेळ मिळाला नसल्याचे तेथील प्रकल्प अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आम्हाला मुलाखतीसाठी कधी बोलाविण्यात येणार याची वारंवार विचारणा अर्जदार महिला व त्यांचे नातेवाईक करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
आंगणवाडी सेविकांच्या १५८० पदांसाठी १५ हजार अर्ज
By admin | Updated: September 3, 2014 23:29 IST