गोंदिया : गोंदिया नगर परिषदेच्या इतिहासात मागील वर्षी सर्वाधिक ५० टक्केच्यावर कर वसुली करण्यात आली होती. यंदा वसुली विभागाकडून हा रेकॉर्ड सर करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. मात्र त्यांना यासाठी उरलेल्या १५ दिवसांत किमान पावणेदोन कोटी रूपयांची वसुली करावी लागणार आहे. मात्र वसुली विभागाची गती पाहता हे काम कठीण असल्याचे दिसून येते.मागील वर्षी नगर परिषदेने कं बर कसून कर वसुलीची मोहीम राबविली होती. अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच कर वसुलीच्या कामात हिरीरीने लागले होते. याचे फलीतही तसेच मिळाले व नगर परिषदेने ५० टक्के कर वसुली करून दाखविली. पालिकेच्या इतिहासात एवढी वसुली पहिल्यांदाच झाली असावी. यंदा मात्र कर वसुली विभाग कोठेतरी कमकुवत दिसून येत आहे. मागील वर्षी ११ कोटींचे टार्गेट असताना उत्कृष्ट कामगिरी करण्यात आली होती. यंदा नऊ कोटी ५० लाखांचे टार्गेट असताना विभागाला मात्र हे टार्गेट जड जात आहे. यंदा एकतर कर वसुलीची मोहिम उशिरा सुरू झाली. त्यात निवडणुकीचे काम आल्याने कर वसुली कर्मचाऱ्यांची फजीती झाली व त्याचा परिणाम कर वसुली मोहिमेवरही पडला. शंभर टक्के कर वसुली तर शक्य नाहीच मात्र ५० टक्के कर वसुलीही विभागाला जड जात असल्याचे दिसून येत आहे. आर्थिक वर्ष सरण्यासाठी आता १५ दिवस उरले आहेत. त्या हिशोबाने कर वसुली विभागाला किमान ५० टक्के कर वसुलीचे मागील वर्षीचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आणखी पावणे दोन कोटींची कर वसुली करावयाची आहे. आता फक्त १५ दिवसांत एवढी वसुली कठीण असली तरीही अशक्य नसल्याने कर्मचारी वसुलीच्या कामात व्यस्त आहेत. (शहर प्रतिनिधी)आतापर्यंत तीन कोटींची वसुली ४कर वसुली विभागाने आतापर्यंत तीन कोटी तीन लाख ३५ हजार ५४० रूपयांची कर वसुली केली आहे. यात या १५ दिवसांत ५२ लाख ७८ हजार ३०७ रूपयांची कर वसुली करण्यात आली आहे. त्यांना नऊ कोटी ५० लाख रूपयांच्या वसुलीचे टार्गेट आहे. त्यामुळे पालिकेला मागील वर्षाचे उद्दीष्ट साधण्यासाठी अधिक धडपड करावी लागणार आहे. त्यामुळे आता मागील वर्षीचा रेकॉर्ड यंदा ब्रेक होतो की नाही हे तर १५ दिवसांनंतरच दिसेल.
सहा कोटींच्या वसुलीसाठी उरले १५ दिवस!
By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST