लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आदिवासी बांधवांचे दैवत असलेल्या पारी कुपार लिंगो माँ कंकाली देवीचे स्थान असलेल्या सालेकसा तालुक्यातील ग्राम कचारगड येथील यात्रेला सोमवारपासून (दि.१०) सुरुवात होत आहे. या यात्रेत देशभरातून लाखोंच्या संख्येत आदिवासी बांधव सहभागी होत असल्याने त्यांच्या सोयीसाठी येथील बस आगाराकडून १५ बसेसची सोय करण्यात आली आहे. या बसेसद्वारे भाविकांना कचारगड येथे घेऊन जाणे व परत आणण्याची सोय केली जाणार आहे.
जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे आदिवासी बांधवांचे दैवत पारी कुपार लिंगो माँ कंकाली देवीचे देवस्थान असून, तेथे १० ते १४ फेब्रुवारीदरम्यान यात्रा भरणार आहे. या यात्रेत मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, महाराष्ट्र व इतर राज्यांतून भाविक येथे मोठ्या श्रद्धेने लाखोंच्या संख्येत येतात. गोंदिया स्थळापासून सालेकसा येथे जाण्यासाठी रेल्वेची सोय असली तरी बसेसनेही भाविक कचारगड येथे यात्रेत जातात. अशात त्यांना ये-जा करताना गैरसोय होऊ नये याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी नुकतीच यात्रेसाठी आढावा बैठक घेऊन दिले होते.
त्यानुसार, गोंदिया आगाराकडून कचारगड येथील यात्रेत भाविकांना जाण्या-येण्याची सोय व्हावी यासाठी १५ बसेसचे नियोजन करण्यात आले आहे, तर साकोली आगाराकडूनही बसचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती आहे. या बसेसद्वारे कचारगड येथे जाणाऱ्या भाविकांना तेथे घेऊन जाणे व परत आणण्याची सोय केली जाणार आहे. जेणेकरून भाविकांची प्रवासासाठी गैरसोय होणार नाही, असे गोंदिया आगार व्यवस्थापक यतीश कटरे यांनी कळविले आहे.
कचारगड येथून परत येण्यासाठी
- कचागरड येथून गोंदियासाठी : सकाळी ११ वाजता, सकाळी ११:३० वाजता, दुपारी १२:१५ वाजता, दुपारी ३:३० वाजता, सायंकाळी ४:१५ वाजता, सायंकाळी ५:३० वाजता.
- कचारगड येथून आमगावसाठी : दुपारी १:४५ वाजता.
- कचारगड येथून सालेकसासाठी : सकाळी १०:४५ वाजता, सकाळी ११ वाजता, सकाळी ११:४५ वाजता, दुपारी १२:३० वाजता, दुपारी २:१५ वाजता बस आहे.
असे आहे बसचे वेळापत्रक
- गोंदियावरून कचारगडसाठी : सकाळी ८ वाजता, सकाळी ८:३० वाजता, सकाळी ८:४५ वाजता, सकाळी ९ वाजता, दुपारी १२:४५ वाजता, सायंकाळी ७:३० वाजता.
- आमगाव बसस्थानकावरून कचारगडसाठी : दुपारी १२ वाजता.
- सालेकसा येथून कचारगडसाठी : ३ सकाळी ११ वाजता, सकाळी ११:३० वाजता, दुपारी १ वाजता, दुपारी ४:३० वाजता.