लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण १३३ जणांचे स्वॅब नमुने घेऊन ते तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी १२२ नमुन्यांचा अहवाल सोमवारपर्यंत (दि.१३) प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर ११ नमुन्यांचा अहवाल अद्याप जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झालेला नाही. आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या सर्वच नमुन्यांचा अहवाल हा कोरोना निगेटिव्ह आल्याने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.मागील आठवडाभरापासून देशात आणि राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रात हा आकडा आता दोन हजारावर गेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागातर्फे खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात आहे. तसेच थोडासाही संशय आल्यास अशा रुग्णांना शासकीय रुग्णालयात क्वारंटाईन करुन त्यांच्यावर वेळीच उपचार करुन त्यांचे स्वॅब नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे. प्रत्येक गावागावात जंतूनाशक फवारणी, बाहेर जिल्हा आणि राज्यातून आलेल्यांवर नजर ठेवून त्यांना होम क्वारंटाईन केले जात आहे. कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.कांदबरी बलकवडे या दररोज आढावा घेत आहे.पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पॉझिटिव्ह प्रयत्न होत असल्यानेच गोंदिया जिल्हा कोरोना निगेटिव्ह होत असल्याचे दिलासा दायक चित्र आहे. १३ मार्चपर्यंत जिल्ह्यातील एकूण १३३ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी १२२ नमुन्यांचा अहवाल १३ एप्रिलपर्यंत प्राप्त झाला असून हे सर्व नमुने निगेटिव्ह आले आहे. तर ११ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही.६१ जण शासकीय कक्षात क्वारंटाईनजिल्ह्यातील दोन शासकीय कक्षात सध्या ६१ जणांवर उपचार सुरू आहेत. यात गोंदिया येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात ५१ आणि लहीटोला येथील कक्षात १० अशा एकूण ६१ जणांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली.२० दिवसात एकाही नवीन रुग्णांची नोंद नाहीजिल्ह्यात पहिला कोरोना बाधीत रुग्ण २६ मार्च रोजी आढळला होता.त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने युध्द पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरूवात केली. त्यामुळे जिल्ह्यात मागील २० दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण जिल्ह्यात आढळला नाही. जिल्हावासीयांसाठी देखील ही दिलासा दायक बाब आहे.
होम क्वारंटाईन असणाऱ्यांवर करडी नजरजिल्ह्यात विदेश आणि बाहेरील राज्यातून आलेल्या व्यक्तींना जिल्हा प्रशासनाने होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे या लोकांची नियमित आरोग्य तपासणी केली जात आहे.