लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यासंबंधी विधानसभा अधिवेशनात राजभाषा कायद्यात दुरुस्ती प्रस्ताव मांडण्याची विनंती करणारे निवेदन साखळीतील मराठीप्रेमींनी शनिवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठीप्रेमींशी चर्चा करत मराठीवर कोणताही अन्याय होणार नाही, असे सांगत मराठीचा मान राखला जाईल, अशी हमी दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
या शिष्टमंडळात साखळीतील ज्येष्ठ शिक्षक दामोदर नाईक, ज्येष्ठ मराठीप्रेमी श्यामसुंदर कर्पे, शशिकांत नाईक, प्रणव बाकरे, वर्धमान शेंदुरे, दिनेश नाईक, प्रसाद वझे, शांताराम काणेकर, पुंडलिक गावडे यांचा समावेश होता.
मराठी राजभाषेचा जो विषय आहे त्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन मराठीला योग्य सन्मान द्यावा, अशी मागणी मराठीप्रेमींनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले व मराठीला न्याय देणारी भूमिका निश्चित घेण्यात येईल, असे सांगितले. गोव्यात दरवर्षी सात ते आठ मराठी साहित्य संमेलनांबरोबर अनेक कविता संमेलने, मेळावे व इतर रंगभूमीवर हजारहून अधिक नाटके होतात. दैनंदिन जीवनात बहुसंख्य गोमंतकीयच मराठीच बोलतात. मात्र, याच मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा नाही, ही खंत आहे. त्यामुळे सरकारने विधानसभा अधिवेशनात राजभाषा कायद्यात दुरुस्ती करून कोंकणीबरोबरच मराठीलाही राजभाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी मराठीप्रेमींनी केली.
अधिवेशनाकडे लक्ष
मुख्यमंत्र्यांनी मराठीसंदर्भात सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती साखळीतील ज्येष्ठ मराठीप्रेमींच्या शिष्टमंडळाने दिली आहे. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मराठीच्या विषयावर नक्कीच सरकार ठोस निर्णय घेण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे आता अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.